पिंप्री निर्मळचा शेती वीजपुरवठा सुरळीत करा

ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी
पिंप्री निर्मळचा शेती वीजपुरवठा सुरळीत करा

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात रब्बीच्या पिकांची उभारणी सुरू आहे. मात्र मापरवाडीसह इतर गावांचा लोड फिडरवर वाढल्याने गावाला दिवसा तासभरही शेतीची वीज मिळत नसल्याने खरिपाची पिके ध्योक्यात आली आहेत. वीज वितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

परतीच्या पावसाचा आधार मिळाल्याने पिंपरी निर्मळ परिसरात रब्बीची पिके उभी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. मात्र वीज टंचाईमुळे शेतकर्‍यांना फटका बसत आहे. बाभळेश्वर 200 केव्ही येथून पिंपरी निर्मळ फिडरद्वारे गावाला वितरणकडून शेती वीजपुरवठा होतो. या फिडरवर इतर गावांचा शेती कनेक्शनचा बोजा वितरणने टाकला आहे. यामध्ये बाभळेश्वर येथील कोकाटे मळा, राजुरी येथील मुसमाडे वस्ती, लोणी खुर्द येथील मापरवाडी व गाडगे मळा यांचा समावेश आहे.त्यामुळे या फिडरची लांबी 35 किमीपेक्षा जास्त झाली आहे.

या वाढलेल्या अतिरिक्त लोडमुळे गावाला केला जाणार्‍या शेती वीज पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. दिवसभरातील आठ तासांच्या वीज पुरवठ्यात तासभरही वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. वीज वितरणने हा वाढविलेला अवांतर लोड कमी करावा व गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी कार्यकारी अभियंता श्री. सोनवने यांना निवेदन दिले. यावेळी गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ, सेवा संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब घोरपडे, तंटामुक्ती कमेटीचे अध्यक्ष दशरथ निर्मळ, जनसेवा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जालिंदर निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य डॉ. विकास निर्मळ, भिमराज निर्मळ उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत पिंपरी निर्मळ फिडरवर टाकलेला मापरवाडी व राजुरी फीडरचा ओव्हरलोड कमी करण्यासाठी येत्या दोन तीन दिवसांत कार्यवाही करून दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करू, असे आश्वासन कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com