पिंपळगाव पिसा येथे गांजासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

एक संशयित जेरबंद || बेलवंडी पोलिसांची कामगिरी
पिंपळगाव पिसा येथे गांजासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव पिसा परिसरात एका चारचाकी गाडीवर छापा मारून वाहतूक केली जात असलेला गांजा पकडला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.30) करण्यात आली. यात गांजासह, चारचाकी गाडी व इतर असा एकूण 6 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बबन संभाजी पंदरकर (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांच्याआदेशानुसार बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाने आंमली पदार्थांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. ठेंंगे यांना मंगळवारी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर अवैध दारू व बनावट हत्याराची चोरटी वाहतूक होणार आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने संजय ठेंगे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पंचासह जाऊन कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश दिले.

त्यानुसार या पथकाने ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर पिंपळगाव पिसा आठाचा मळा येथे सापळा रचला. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे प्रत्येक संशयीत वाहनांना थांबवून त्याची तपासणी करत असताना सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास एक सिल्वर रंगाची पजेरो (गाड़ी क्र एमएच 01 , एएल 1234) अशी संशयित गाडी आली असता गाडीस थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये मागील सिटच्या खाली 7 किलो 418 ग्रॅम वजनाचे गांजाचे खाकी रंगाचे सात पुडे आढळून आले. याची किंमत बाजारात 74 हजार रुपये आहे. तसेच 5 लाख 50 हजार रुपये किंमतीची एक सिल्व्हर रंगाची पजेरो गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित बबन संभाजी पंदरकर याविरुध्द अंमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. स. ई. गाजरे करत आहेत.

सदरची कारवाई ही राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे मागदर्शनाखाली पो.नि.श्री.संजय, पो. स. ई. गाजरे, स. फो. आर. टी. शिंदे, पो.हे.कॉ. हसन शेख, पो.हे.कॉ. अजिनाथ खेडकर, चा.पो.हे.कॉ. भाऊ शिंदे, पो. कॉ. विनोद पवार, पो. कॉ. संदिप दिवटे, पो. कॉ. कैलास शिपनकर, पो. कॉ. सतिष शिंदे, पो. कॉ.भांडवलकर, म.पो.ना. वलवे, म.पो.कॉ.घोगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कर्जत येथील पो.हे.कॉ प्रकाश शिंदे, पो. कॉ. इरुफान शेख यांनी केली आहे.

तरी बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील जनतेला आवाहन करण्यात येते की, अवैध दारु, गांजा व बनावट हत्याराची चोरटी वाहतूक करत असल्यास बेलवंडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com