
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड लघु बंधार्यातून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील 20 गावांना पिण्याचे पाणी देण्या अगोदर नवीन जलसाठा उपलब्ध करा, मगच पठारभागाला पाणी द्या, अशी मागणी पिंपळगाव खांड धरण लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतकर्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक नाशिक विभागाचे मुख्य अभियंता एस. पी. भुजबळ यांच्याकडे केली.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव पाट, पांगरी, मोग्रस, कोतुळ, भोळेवाडी, पिंपळगाव खांड तसेच खालील भागातील बोरी वाघापूर लहीत खुर्द, लहीत बुद्रुक, लिंगदेव, चास, पिंपळदरी या गावांतील शेतकर्यांनी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता श्री. भुजबळ यांना निवेदन दिले.जलजीवन मिशन योजने अंतर्गत जवळे बाळेश्वर व इतर संगमनेर पठार भागातील गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलावातून मंजूर झाली आहे.
मात्र पिंपळगाव खांड लघु बंधार्यातून पाणी न देता दुसरा उदभव निर्माण करून पठार भागाला द्या, अशी जोरदार मागणी लाभधारक क्षेत्रातील शेतकर्यांनी मुख्य अभियंत्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये मुख्य मुद्दा पठार भागातील नळ योजना पिंपळगाव तलावातून न करता पूर्व भागात कोल्हापूर पध्दतीचा नवीन बंधारा बांधून त्यातून पाणी उचलावे, तसेच मुळा नदीच्या पावसाळ्यामध्ये ओव्हर फ्लोच्या पाण्याने नवीन साठवण तलाव तयार करून तिथून पठार भागाला पाणी द्यावे, मुळा परिसरात नवीन दोन तीन ठिकाणी जलसाठे निर्माण करण्याचा जलसंपदा व जलसंधारण खात्याकडे आ. डॉ. किरण लहामटे यांच्या मार्फत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा चालू आहे.
तोपर्यंत वरील योजना सुरू करण्याची घाई करू नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली आहे.उन्हाळ्यामध्ये पिंपळगावच्या जलाशयात पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे आजूबाजूच्या गावांनाच पाणी टंचाई होते. मुख्य अभियंता यांनी जलसंपदा खात्या बरोबर चर्चा करून संयुक्त बैठक वरिष्ठ पातळीवर करण्याचे मान्य केले. या बैठकीस सिताराम पाटील गायकर, पाट पाण्याचे अभ्यासक मिनानाथ पांडे, अगस्तीचे ज्येष्ठ संचालक अशोक देशमुख, भाऊसाहेब बराते, शिवाजी वाल्हेकर, सोपान शेळके, भानुदास डोंगरे, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब हाडवळे, संजय साबळे, सदाशिव कानवडे, भाऊपाटील कानवडे, माधव कोरडे, अतुल चौधरी, विठ्ठल साबळे, दत्ताराम साबळे, सुरेश देशमुख, रोहिदास भोर, ज्ञानेश्वर भोर, नारायण थटार, दगडू डोंगरे, लहानू चौधरी आदी लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
पिंपळगाव खांड धरणातून पठार भागासाठी मंजूर झालेली नवीन पाणी योजना सुरू होऊ नये या मागणीसाठी पिंपळगाव खांड धरण लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या वतीने पिंपळगाव खांड गावात रविवार दि.12 जून 2022 रोजी सकाळी 9 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाऊसाहेब बराते यांनी दिली.