पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पेटणार

लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी जाऊ न देण्याचा पाणी बचाव समितीचा इशारा ; आज धरणस्थळी बैठक
पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पेटणार
संग्रहित

कोतूळ |वार्ताहर| Kotul

पाणी योजनांच्या नावाखाली पिंपळगाव खांड धरणातून पाणी पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा देत पिंपळगाव खांड धरण पाणी बचाव कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत आज रविवार दि. 8 रोजी सकाळी 8 वाजता पिंपळगाव खांड धरण स्थळावर लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची बैठक होत आहे, यामुळे पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पेटणार आहे.

अकोले तालुक्यातील 600 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आता कळीचा मुद्दा बनत आहे. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपले राजकीय वजन वापरून मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण बांधले. धरण लाभक्षेत्रात असणार्‍या गावांना शेती आणि पिण्याच्या पाणी योजना करण्यासाठी धरणाला मंजुरी घेतली मात्र आता या धरणातून लाभक्षेत्रात नसणार्‍या गावांना पाणी योजना राबवून पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने या पाण्याचे राजकारण आता पेटणार आहे, अशी चिन्ह निर्माण झाले आहे.

पिंपळगाव खांड धरण पाणी बचाव समितीने याबाबत आंदोलनाचा इशारा दिला असून आज रविवार दि. 8 पिंपळगाव खांड धरणावर परिसरातील लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची बैठक आयोजित केली आहे. गावोगावी दवंडी देण्याचे काम सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाण्याला आता राजकीय रंग चढणार आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी लाभक्षेत्रातील गावांच्या पाणी योजना व शेतीसाठी हे धरण पूर्ण केले मात्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी पाणी योजनांच्या नावाखाली पाणी पळवून नेत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख यांनी केला आहे. पिचडांची केलेल्या धरणातून पाणी पळविण्यापेक्षा मुळा नदीवर अनेक साईट आहेत त्या ठिकाणी धरण बांधा मग त्यातून पाणी घ्या, परंतु आयत्या पिठावर रेघा मारू नये, असे सीताराम पाटील देशमुख यांनी म्हटले आहे.

मंत्री थोरात आणि आमदार किरण लहामटे यांनी पठार भागासाठी मुळा नदीवर स्वतंत्र धरण बांधावे. त्यास आमचा विरोध नाही परंतु पिंपळगावच्या लाभक्षेत्रात नसणार्‍या गावांना पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पिंपळगाव देपा, डोळासणे, कर्जुले पठार, वरुडी पठार, सारोळे पठार, माळेगाव पठार, सावरगाव घुले, महालवाडी, पोखरी बाळेश्वर, जवळेबाळेश्वर, पिंपळगाव माथा अशा अकरा गावांसह वाड्यांना पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पिंपळगाव खांड धरणातून पिण्याची पाण्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजुरी मिळाली आहे.

यासाठी 65 कोटी रुपये निधी खर्च होणार आहे. अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहे तर आमदार लहामटे यांनी अकोले तालुक्यातील कळंब, मन्याळे, ब्राह्मणवाडा या गावासाठी पिंपळगाव खांड धरणातून 22 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. पिंपळगाव खांड धरण लाभक्षेत्रातील गावांच्या व्यतिरिक्त इतर गावांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने धरण पाणी बचाव समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे यासाठी उद्या होणार्‍या बैठकीतून काय निर्णय होतो याकडे आता लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.