कोतुळ : पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो

मुळा धरणाच्या दिशेने पाणी, भंडारदरातही आवक सुरू
पिंपळगाव खांड
पिंपळगाव खांड

कोतुळ, भंडारदरा (वार्ताहर)- मुळा पाणलोटात आद्राच्या सरी जोरदार कोसळू लागल्याने मुळा नदीवर असलेल्या 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव धरण आज पहाटे ओव्हरफ्लो झालेले असेल. हे धरण भरल्यानंतर नदीचे पाणी मुळा धरणाच्या दिशेने निघाले होते.

मध्यंतरी गायब झालेला मान्सून आता मुळा पाणलोटात दोन दिवसांपासून सक्रिय झाल्याने हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई भागात अधूनमधून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे उगमस्थानापासून मुळा नदी वाहती झाली आहे. हे पाणी पिंपळगाव खांड धरणात जमा होत असून काल रात्री या धरणातील साठा 550 दलघफूच्या पुढे सरकला होता.

पाऊस सुरूच असल्याने पहाटे हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे या धरणातून पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे. आंबित पाठोपाठ हे धरण भरलल्याने परिसरातील शेतकर्‍यांत समाधान आहे.

दरम्यान, भंडारदरा पाणलोटातही पावसाने काहीसा जोर धरला आहे. काल दुपारी पावणेचार ते पाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. या पावसाची नोंद 9 मिमी झाली. काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या या धरणात 2829 दलघफू पाणीसाठा होता.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत झालेला पाऊस असा (मिमी)- भंडारदरा 30, घाटघर 94, पांजरे 65, रतनवाडी 44, वाकी 25.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com