पीकअप चोरीतील आरोपी निफाड येथून मुद्देमालासह ताब्यात

पीकअप चोरीतील आरोपी निफाड येथून मुद्देमालासह ताब्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पिकअप चोरीतील आरोपीस चोवीस तासांत मुद्देमालासह श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. ओम उमेश जनवेजा (रा. गुरुनानकनगर, वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.

दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी एकनाथ रामदास शिंदे (रा. रांजणखोल ता. राहाता) यांची महिंद्रा पिकअप (क्र. एम.एच. 09, सी.ए. 7665) गाडी श्रीरामपूर-बाभळेश्वर रोडवरील नवजोत पेट्रोलपंप येथे पार्किंग केली होती. मात्र येथून अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती. याबाबत त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुरनं. 822/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास गाडीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी गेले. सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर गाडी संगमनेर रोडने गेल्याचे दिसले. या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता गुप्त माहितीच्या आधारे ही निफाड येथे गेल्याचे समजले. पथकाने तात्काळ निफाड येथे जाऊन गाडीचा शोध घेतल्यानंतर निफाड बाजारतळ येथे गाडी उभी असलेली आढळून आली. तसेच गाडीत एक इसमही होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता नवजोत पेट्रोलपंप येथून गाडी चोरल्याची त्याने कबुली देत ओम उमेश जनवेजा असे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास पोलीस नाईक साईनाथ राशिनकर करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com