कचरा उचलण्यावरून सुप्यात सोशल मीडियावर रणसंग्राम

ग्रामपंचायत प्रशासन दुहेरी अडचणीत
कचरा उचलण्यावरून सुप्यात सोशल मीडियावर रणसंग्राम

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीचे कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. याठिकाणी कचरा टाकण्याची अडचण असल्यामुळे वेळेवर कचरा उचला जात नाही, म्हणून सध्या सुप्यात सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप रंगला आहे. ग्रामपंचायत प्रशासन दुहेरी अडचणीत सापडले असून साठलेल्या कचर्‍यामुळे गावात दुर्गंधी निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून सुप्याची ओळख होत आहे. महामार्गावरील गाव, चौफुल्याचे ठिकाण व औद्योगिक वसाहत यामुळे येथे नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे गावाचे नागरिकरण झपाट्याने झाले आहे. पर्याय येथे नागरी सुविधा पुरवताना ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोवर स्थानिक नागरिक कचरा टाकून देत नसल्यामुळे ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी कचरा उचलला जात नाही.

परिणामी गावात साचलेल्या कचर्‍यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया चिकनगुणीया यासारख्या साथीचे आजार गावात वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. तर विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या म्हणण्यानुसार कचरा टाकण्याची अडचण ही आम्ही सत्तेवर येण्या आधीपासूनची आहे. तरीही आम्ही जशी संधी मिळेल, तसा कचरा उचलत असून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान, सध्या सुप्यात कचरा उचलण्यावरून सोशल मीडियावर चांगलाच कलगीतुरा रंगला असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. कचरा डेपोवर टाकण्यास स्थानिक नागरिक विरोध करत असून गावातील कचरा उचलला जात नाही, म्हणून ग्रामस्थ नाराज आहेत. अशा दुहेरी कात्रीत ग्रामपंचायत प्रशासन अडकले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साठलेल्या कचर्‍यांमुळे दुर्गधी निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.