पोलीस अधीक्षकांना अंधारात ठेऊन राळेगणसिद्धी दौरा

पोलीस अधीक्षकांना अंधारात ठेऊन राळेगणसिद्धी दौरा

सुपा |वार्ताहर| Supa

पोलिस दलातील बदल्यांच्या पार्श्वभुमिवर स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त जागेवर बसण्यासाठी धडपड करीत असलेले

पोलिस निरिक्षक संपत शिंदे यांनी नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. कार्यक्षेत्राबाहेरील एखाद्या पोलिस निरीक्षकाने हजारे यांची घेतलेली ही पहिलीच भेट. वादग्रस्त कारकीर्दीमुळे शिंदे यांच्यावर टिकेची झोड उठविण्यात येत असून त्यांच्या विनंती बदलीवरही शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारे यांच्याकडेही लेखी तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभुमिवर शिंदे यांनी राळेगणसिद्धीत येत हजारे यांची भेट घेत भेटीचे छायाचित्र काढून घेतले. एलसीबीच्या खुर्चीत बसण्यासंदर्भात मात्र या भेटीत काहीच चर्चा झाली नसल्याची खात्रीशिर माहीती आहे. ते केवळ सदिच्छा भेटीसाठी आले हाते. पाच मिनीटात छायाचित्र काढून ते तेथून परतल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील आश्वी येथील रहिवासी असलेले संपत शिंदे हे निवृत्त होण्याच्या मार्गावर असून त्यामुळेच त्यांना नगर जिल्ह्यात बदली देण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही शिंदे यांनी नगर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात काम केलेले असताना मागील निवडणूकीत त्यांची जिल्हयातून नाशिक येथे बदली झालेली आहे. असे असताना पुन्हा नगरचा अट्टहास कशासाठी हा प्रश्न या निमित्ताने विचारला जातो आहे.

बदली करून आल्यानंतर शिंदे यांनी थेट एलसीबीच्या खुर्चीवरच हक्क सांगितल्यामुळे ते अधिकच प्रकाशझोतात आले असून त्यांच्या या खटाटोपास सार्वत्रीक विरोध होऊ लागलेला आहे. अशाच वर्तनुकीमुळे अपर पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांची गच्छंती झालेली असताना शिंदे मात्र एलसीबीचा हट्ट सोडण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी त्यासाठी वजनदार मंत्र्याच्या भाच्याकडून फिल्डींग लावली असल्याचीही माहीती आहे.

अण्णा हजारे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर शिंदे यांनी हजारे यांची भेट घेतल्याचा देखावा करून वरीष्ठांपुढे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी हजारे यांनी मात्र शिंदे यांच्यासाठी काहीही शब्द दिला नसल्याची माहीती आहे. त्यामुळे केवळ छायाचित्र काढून ते पुन्हा नगरकडे परतल्याचे सांगण्यात आले.

शिंदे राळेगणसिद्धीत आलेच कसे ?

जिल्हयाचे पोलिस अधिक्षक तसेच पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हजारे यांच्या भेटीसाठी नेहमी राळेगणसिद्धीस भेट देत असतात. सुरक्षेच्या कारणावरून अधिकार्‍यांच्या राळेगणसिद्धीस भेटी होत असताना अपर पोलिस अधिक्षकांपासून उपविभागिय पोलिस अधिकारीही कर्तव्यावर असताना हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीस जात नाहीत. असे असताना एलसीबीच्या खुर्चीवर बसण्यासाठी उताविळ झालेले संपत शिंदे यांनी थेट राळेगणसिद्धी गाठून केलेल्या देखाव्याविषयी अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हजारे यांच्या भेटीला येताना शिंदे यांनी पोलिस अधीक्षकांचीही परवानगी घेतली नसल्याची माहिती असून कर्तव्यावर असताना त्यांनी केलेला राळेगणसिद्धी दौराही वादग्रस्त ठरला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com