
अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
करोनामुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत. अशा वेळी विविध संस्था, विषय संघटना, तंत्रस्नेही शिक्षकांनी तसेच शासनाच्या वतीनेही दूरस्थ शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळत ऑनलाईन शिक्षण पद्धत दृढ करण्याचा मागील चार महिन्यांत प्रयत्न केला. शासनाच्या दिक्षा अॅपच्या माध्यमातून सर्व विषयांचे अध्यापन सुरू असताना शारीरिक शिक्षणाला मात्र यामध्ये शासनाच्या वतीने न्याय मिळाला नाही, म्हणून राज्यातील तंत्रस्नेही शारीरिक शिक्षकांना एकत्र करत शारीरिक शिक्षणाचे ई कंटेंट तयार करण्यासंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून गुगल फॉर्मच्या माहिती आधारे सहभागी झालेल्या 220 तंत्रस्नेही शिक्षकांसाठी राज्यस्तर तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यात आली. 15 जुलैपासून सुरु झालेल्या कार्यशाळेत प्रा. रोहित आदलिंग व राजेंद्र कोतकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ई-मेल तयार करणे, गुगल फॉर्म तयार करणे, गुगल फॉर्ममध्ये क्वीझ तयार करणे, इमेज जोडणे, व्हिडिओ लिंक जोडणे, ई-कंटेंट तयार करणे, पीपीटी तयार करणे, पीपीटी इफेक्ट देणे, स्मार्ट पीडीएफ तयार करणे, अभ्यासक्रमासंदर्भातील व विविध खेळ बाबींचे व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणारे मोबाईल, पीसी सॉफ्टवेअर व टुल्सची माहिती कार्यशाळेत देण्यात आली.
शारीरिक शिक्षण विषयक तंत्रशुद्ध व्हिडिओंची निर्मिती कशी करावी, हे विविध व्हिडिओंच्या माध्यमातून दाखवून यू ट्यूब चॅनल तयार करणे, व्हिडिओ अपलोड व शेअर करणे याची माहिती रोहित आदलिंग यांनी दिली. तसेच प्रशिक्षणानंतर कार्यशाळेतील घटकावर टास्क देऊन टास्क पूर्ण करणार्या तंत्रस्नेही शिक्षकांना राज्य तंत्रस्नेही प्रमाणपत्र देण्यात आले. तयार होणारे ई-कंटेंट शारीरिक शिक्षणाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी राज्यभर सोशल मीडियातून विद्यार्थ्यांपर्यंत पोाहोचविले जाणार आहे.
सात दिवसीय राज्यस्तर तंत्रस्नेही कार्यशाळेचा प्रारंभ भारतीय खो खो टीमचे माजी उपकर्णधार व धुळे येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू, तंत्रस्नेही आनंद पवार यांच्या हस्ते झाला. कार्यशाळेस अॅथलेटिक्स राष्ट्रीय तांत्रिक समितीचे अधिकारी चंद्रकांत पाटील, मुख्याध्यापक महासंघाचे जयदीप सोनखासकर, रिलायन्स फाउंडेशन स्कूलचे तंत्रस्नेही लक्ष्मण चलमले, राज्य कोषाध्यक्ष घनश्याम सानप, राज्य सचिव राजेंद्र कदम,
जळगाव येथील राज्य वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, सिलंबम व थायबॉक्सिंगचे राज्य सचिव श्रीधर गायकवाड, मुंबई मनपा शारीरिक शिक्षण युनिटचे डॉ. जितेंद्र लिंबकर, सिंधुदुर्ग येथील राज्य समन्वयक दतात्रय मारकड, विभागीय अध्यक्ष दतात्रय हेगडकर, राज्य तायक्वांदोचे उपाध्यक्ष अविनाश बारगजे, रत्नागिरीचे कृष्णाजी गावडे, राज्य समन्वयक अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष गागरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत पवार, दिनेश भालेराव, संदीप घावटे, सुनील सूर्यवंशी, पंकज पाठक, सचिन पाटील, विष्णू खांदोडे, देवेन सोनटक्के, उमेश कडू, मंगेश कडू, संजय मैंद, सचिन पाटील, पुरुषोत्तम पळसुले, अनिल दाहोत्रे, मोहन पाटील, उमेश खंदारकर, उमेश झोटिंग, अभिजीत दळवी, विनोद तारू, गणेश म्हस्के, बाळासाहेब कोतकर व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.