शारीरिक शिक्षणाचा समावेश दिक्षा अ‍ॅपमध्ये करणार

शिक्षण संचालक पाटील : शारीरिक शिक्षणाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा शुभारंभ
शारीरिक शिक्षणाचा समावेश दिक्षा अ‍ॅपमध्ये करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या गंभीर परिस्थितीला जग सामोरे जात असताना रोगप्रतिकारक शक्ती माणसाला तारते आहे. ही रोगप्रतीकारक शक्ती योगा, प्राणायम, सूर्यनमस्कार, एरोबिक्स तसेच इतर व्यायाम प्रकारांतून निर्माण होते. या सर्व बाबी शारीरिक शिक्षणात येत असल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षणातील तंत्रशुद्ध व्यायाम प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व रोगप्रतीकारक क्षमता वाढविण्यासाठी आहे.

शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलने तयार केलेले ‘ई’ कंटेंट हे दिक्षा अ‍ॅप व जिओ टीव्ही चॅनेलवर घेण्यात येऊन सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शासन घेईल, असे आश्वासन राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक तथा शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले. राज्यात संघटना स्तरावर प्राथमतःच असा प्रयत्न झाला असल्याचे नमुद करून शारीरिक शिक्षक संघटना, व तंत्रस्नेही पॅनलचे त्यांनी कौतुक केले.

राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलद्वारा निर्मीत शारीरिक शिक्षण ‘ई’ कंटेंटचा शुभारंभ पाटील यांच्याहस्ते झाला. राज्याचे क्रीडा आयुक्त यांनी शारीरिक शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालून सुदृढ व निरोगी समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांतून शासनाचा क्रीडा विभाग कार्यरत असल्याचे मत व्यक्त करून तंत्रस्नेही पॅनलच्या कार्याचे कौतुक केले.

तर शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागात समन्वय राहिल्यास भारताचा आधारस्तंभ असलेला विद्यार्थी सुदृढ झाला तर करोना सारख्या कितीतरी महामारीला तो पळवून लावेल असे मत सहाय्यक संचालक सुहास पाटील यांनी व्यक्त केले.राज्यातील विविध जिल्ह्यांतील 220 शारीरिक शिक्षकांना एकत्रित करून 7 दिवसांचे ट्रेनींग देण्यात आले.

जवळपास 49 विविध विषयांचे पॅनल तयार करून तंत्रशुद्ध-ई-कंटेंट तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून गुगल फॉर्म लिंकद्वारे सुरक्षिततेचा विचार करून ऑनलाईनचा शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू केला. सूत्रसंचलन वरीष्ठ सहसचीव राजेश जाधव यांनी केले.

याप्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दिक्षीत, बालभारती अभ्यासगट सदस्य राजेंद्र पवार, सुवर्णा देवळणकर, लक्ष्मण चलमले, जयदीप सोनखासकर, दत्तात्रय मारकड, सचिन देशमुख, रोहित आदलिंग, घनशाम सानप, जिल्हाध्यक्ष सुनील गागरे, दिनेश भालेराव व संदीप घावटे या तंत्रस्नेहींनी कार्याचा परिचय दिला.

शाळा शिक्षक महासंघ पुणे सचिव चांगदेव पिंगळे, समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे, अमरावती संघटनेचे सहसचिव शिवदत ढवळे, प्रीतम टेकाडे, डॉ. जितेंद्र लिंबकर, अविनाश बारगजे, गणेश माळवे, अनिल पाटील, डॉ.नितीन चवाळे यांनी या उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या. गणेश म्हस्के, बाळासाहेब कोतकर, प्रशांत खिलारी यांनी तांत्रिक सहकार्य केले. या ऑनलाईन सोहळ्यास यू ट्यूब लाईव्ह व झुम बैठकीस 3 हजार दोनशे शिक्षक महाराष्ट्र भरातून सहभागी झाले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com