Photo : भक्तीसागराला पुन्हा उधाण

मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी उघडले; देवीची विधिवत घटस्थापना
Photo : भक्तीसागराला पुन्हा उधाण

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनाच्या संकटाला दूर सारत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भक्तिसागराला उधाण आले आहे. आज नगर शहरासह जिल्ह्यातील देवी मंदिरात विधिवत घटस्थापना झाली. शिर्डी येथील साईमंदिर, शनीशिंगणापूर मंदिराकडे भाविकांचे पाय वळले होते. दर्शनासाठी संख्येसह अन्य निर्बंध असले तरी प्रार्थनास्थळे खुली झाली, याचा आनंद भाविकांनी व्यक्त केला आहे.

करोनामुळे प्रार्थनास्थळे दीड वर्षापासून बंद होती. करोना आता माघारी फिरला आहे. त्यामुळे राज्यसरकारने नवरात्रीत घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मंदिराची कवाडे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मंदिरे उघडताच भाविक दर्शनासाठी पोहचले होते.

मोहटादेवी येथील मंदिरासह नगर शहरातील मंदिरांवर नवरात्रानिमित्त सजावट करण्यात आली आहे. आज मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. धार्मिक स्थळांभोवती यात्रा भरण्यास मनाई आहे. त्यामुळे प्रसाद, हार, फुले, नारळ विक्रीची तुरळक दुकानेच मंदिर परिसरात दिसून आली.

ग्रामदैवताचे दर्शन भाविकांसाठी सुरू

शहराचे ग्रामदैवत भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. गुरुवारी सकाळी उद्योजक मोहन मानधना व परिवाराच्या हस्ते विशाल गणपतीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.

सर्वसामान्यांना मानसिक आधार व संकटाविरोधी लढण्यासाठी देव दर्शन व पूजा आवश्यक होती. शासनाने योग्य निर्णय घेवून मंदिरे खुली केली याचा भाविकांना निश्चित फायदा होईल, असे मोहन मानधना यांनी सांगीतले.

यावेळी सौ. मधुमालती मानधना, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, पंडीतराव खरपुडे, अशोक कानडे, पराग मानधना, कोमल मानधना, विजय कोथंबीरे, पांडुरंग नन्नविरे, हरीचंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, ज्ञानेश्वर रासकर, बापूसाहेब एकाडे, शिवाजी शिंदे, ससाणे, प्रकाश बोरुडे, अनिल रामदासी, कुणाल भंडारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com