Photo : नवरात्रोत्सवासाठी नगरकर सज्ज

मंदिरांमध्ये घटस्थापनेची तयारी | कोविड नियमांचे होणार पालन
Photo : नवरात्रोत्सवासाठी नगरकर सज्ज

अहमदनगर | प्रतिनिधी

शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारी प्रारंभ होत आहे. राज्य शासनाने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिल्याने देवी मंदिरांमध्ये घटस्थापनेची तयारी वेगाने सुरू होती. स्वच्छता, रंगरंगोटीसह अन्य कामे सुरू होती. दरम्यान, कोविड नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा केला जाणार असून भाविकांनीही नियमांचे पालन करूनच दर्शनासाठी यावे असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात आले आहे.

करोना संकटामुळे प्रार्थनास्थळे बंद होती. यंदा नवरात्रोत्सव साजरा करण्याची संधी मिळणार की नाही. याबाबत भाविकांमध्ये संभ्रम असताना राज्य सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे. ७ ऑक्टोबरपासून ७ राज्यातील प्रर्थनास्थळे भाविकांसाठी खुली होतील. गुरूवारपासून नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील देवी मंदिरे घटस्थापनेसाठी सज्ज झाली आहे. उत्सवासाठी तयारीला वेग देण्यात आला आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्याची दुकाने शहरातील विविध भागात सजली होती.

शहरातील चितळे रोड, गंज बाजार, माळीवाडा आयुर्वेद कॉलेज रोड येथील रस्त्यावर मातीचे घट, सप्तकडधान्य, नागवेलची पाने, हारतुरे, फुले, अगरबत्ती, गुगुळ, काळी माती, गोवऱ्या आदी विक्रीची दुकाने लागली आहेत. यंदा सरकारने चार फुटांपर्यंत देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार मूर्तिकारांनी एक ते चार फुटांपर्यंत देवीचे विविध रूप असलेली मूर्ती तयार करून विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

मंदिरांचे सॅनिटायझेशन

राज्यात उद्यापासून सर्व धार्मिक स्थळ खुले करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून कोविड नियम मंदिर प्रशासनाला कळविण्यात आले आहे. त्यानुसार मंदिरांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जात आहे. नगरमध्ये माळीवाडा येथील शनी-मारुती मंदिरात सुरू असलेले सॅनिटायझेशन.

नागापूरचे रेणुका माता मंदिर

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुकामाता देवस्थानात आ. संग्राम जगताप व शीतल जगताप यांच्या हस्ते ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ राजता घटस्थापना होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून पारंपारिक पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव साजरे केले जाणार आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी दिली आहे. करोनामुळे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. ९ ऑक्टोबरला रक्तदान शिबिर, १० ऑक्टोबरला सर्वरोग निदान शिबिर, ११ ऑक्टोबरला स्त्रीरोग निदान शिबिर, १३ ऑक्टोबरला मोतीबिंदू व डोळे तपासणी शिबिर तसेच रात्री होम हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजाभवानी माता मंदिर

सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये घटस्थापना गुरुवारी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. मंदिराचे रंगकाम पूर्ण झाले असून मनपाने परिसर स्वच्छ करून दिला आहे. घटस्थापना गणेश व शीतल तसेच अनंत व रोहिणी या दांपत्यांच्या हस्ते करण्यात येणार असून महाआरतीनंतर दुपारी १ वाजेपासून भाविकांना दर्शन खुले राहणार आहे. मंदिर दर्शनासाठी दर्शन रांग मागील बाजूकडून म्हणजे सबजेलकडून राहणार आहे. सायंकाळी ८ वाजता आरती होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी बाबुराव पलंगे, गणेश पलंगे, अनंत पलंगे, उमेश पलंगे यांच्यासह स्वयंसेवक यावर नियंत्रण ठेवणार आहे.

केडगावचे रेणुका माता मंदिर

केडगाव येथील रेणुका माता मंदिर परिसरामध्ये घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मनपा व केडगाव ग्रामस्थांच्यावतीने पूर्वतयारी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी नियमाचे पालन करावे व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. केडगाव देवी मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त पूर्व तयारीची पाहणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, नवनाथ कोतकर, सुखदेव गुंड, मिनीनाथ कोतकर व महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.