‘फेज टू’ची कामे का रखडली?

‘मजीप्रा’कडून सहकार्य मिळत नसल्याची मनपाची तक्रार
‘फेज टू’ची कामे का रखडली?

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या ‘फेज टू’ योजनेतील कामे अद्यापही रखडलेली आहेत. त्यामुळे शहरात दररोज पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या कामासंदर्भात व्यवस्थापन सल्लागार समिती असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार महापालिका प्रशासनाने प्राधिकरणाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांकडे केली. त्याची दखल घेत मुख्य अभियंत्यांनी अहवाल मागून योजनेची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले. मात्र, ‘मजीप्रा’ च्या स्थानिक अधिकार्‍यांनी या आदेशालाही केराची टोपली दाखवली. त्यामुळे कामे लांबणीवर पडली आहेत. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करूनही नगरकरांना दररोज पाणी मिळत नाही.

पाणी योजनेच्या कामासंदर्भात अनेकवेळा महापालिकेत बैठका झाल्या आहेत. बैठकांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. बैठकीला आल्यानंतरही बैठकीत ठरल्याप्रमाणे कोणतेही नियोजन होत नसल्याने मनपाने थेट मुख्य अभियंत्यांकडे तक्रार करून त्यांचे लक्ष वेधले. योजनेतील कामाच्या अनुषंगाने तांत्रिक अभिप्राय देऊन काम मार्गी लावणे अपेक्षित असताना तसे होत नाही. आवश्यकतेनुसार अतिरिक्त कामे व प्रस्ताव मनपाकडे वेळोवेळी सादर केले जात नाहीत.

कामांची देयके ‘मजीप्रा’ कडे सादर केल्यानंतर एक ते दीड वर्षांच्या कालावधीनंतर ती तपासून सादर केली जातात. यामुळे ठेकेदारामार्फत कामे बंद ठेवली जातात. तसेच, सुरू असलेल्या कामांचे दैनंदिन सुपरव्हिजन होत नाही. मात्र, वितरण व्यवस्थेच्या जलवाहिन्या या फक्त एक ते दीड फूट खोलीवर टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पाणी वितरण करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. योजनेत उभारण्यात आलेल्या उंच टाक्यांमध्ये पाणी पोहचत नाही. यात सुधारणा करण्यासाठी अनेकवेळा सूचना देऊनही कार्यवाही झाली नाही. महापौर व आयुक्त दालनात आयोजित बैठकीसाठी सक्षम अधिकारी उपस्थित राहत नाहीत, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

सध्या योजनेचे काम अंतीम टप्प्यात आहे. वितरण व्यवस्थेची कामे किरकोळ स्वरूपात बाकी आहेत. जलदाब चाचणीचे काम मोठ्या प्रमाणात प्रलंबीत आहे. ‘मजीप्रा’ चा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, ठेकेदार एजन्सीची देयके अदा करण्यास विलंब करणे, ठेकेदार एजन्सीला त्रास देणे, तांत्रिक अभिप्राय जाणुनबुजून उशिराने देणे, यामुळे योजनेचे काम बंद पडलेले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही नगर शहरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याचे मनपाने म्हटले आहे. महापालिकेच्या तक्रारीची दखल घेत मुख्य अभियंत्यांनी तक्रारींवर अहवाल मागून योजनेची कामे तातडीने मार्गी लावण्याचे व त्यासाठी नियोजन करण्याचे आदेश ‘मजीप्रा’ च्या स्थानिक अधिकार्‍यांना दिले होते. मात्र, या आदेशालाही स्थानिक अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली. परिणामी, पाणी योजनेची कामे बंद पडली असून नगरकरांना दररोज पाण्यासाठी आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com