सावधान! नगरमधील पेट्रोल पंपावर होतोय एटीएमचा गैरवापर

पोलिसांनी केली दोघांना अटक
सावधान! नगरमधील पेट्रोल पंपावर होतोय एटीएमचा गैरवापर
पेट्रोल

अहमदनगर|Ahmedagar

पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणार्‍या लोकांच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून बनावट कार्ड तयार करत त्याद्वारे पैसे काढणार्‍या दोघांना सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. सुरज अनिल मिश्रा (वय 23), धिरज अनिल मिश्रा (वय 33 रा. नालासोपारा ता. वसई जि. पालघर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

अरणगाव (ता. नगर) शिवारातील एका पेट्रोल पंपावर हे दोघे कामगार म्हणून काम करत होते. यांच्या सोबत असलेला तिसरा आरोपी सुजित राजेंद्र सिंग (रा. मुंबई) हा पसार झाला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन लाख 61 हजार 500 रूपयांची रोख रक्कम, वेगवेगळ्या बँकेचे 31 एटीएम, मोबाईल असा दोन लाख 79 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर आरोपी काम करत असताना त्याठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी येणार्‍या लोकांचे एटीएम कार्ड स्वाईप करत होते. त्यांच्याकडून एटीएमचा पिन विचारून त्याची डायरीमध्ये नोंद करत होते. स्वाईप केलेल्या एटीएम कार्डच्या मदतीने बनावट कार्ड करून व डायरीत नोंद केलेल्या पिनच्या आधारे आरोपींनी नगर शहरातील वेगवेगळ्या एटीएममधून लाखो रूपये काढले आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच भिंगार व सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना ठाणे जिल्ह्यातून अटक केली. पोलीस निरीक्षक भोसले, सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस कर्मचारी योगेश गोसावी, गोविंद गोल्हार, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, राहुल द्वारके, शेलार यांच्या पथकाने ही कारावाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com