भरदिवसा पेट्रोलपंप व्यवस्थापकास लुटले

डोळ्यात मिरची पुड टाकत 12 लाखाची रोकड लांबवली
भरदिवसा पेट्रोलपंप व्यवस्थापकास लुटले

बेलवंडी |वार्ताहर| Belwandi

पेट्रोल पंपावरील रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून पिस्तुल रोखत 12 लाख रूपयांची रोकड लांबवल्याची घटना आज भरदिवसा दुपारी चार वाजेच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसरात घडली.

याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी चौफुला येथील इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पंपावरील व्यावस्थापक अमोल ढोले यांनी तक्रार दाखल केली आहे. हा पंप संजय शेळके यांच्या मालकीचा आहे. ढोले हे आज दोन ते तिन दिवसाची पेट्रोल पंपावरील 12 लाख रुपयांची रक्कम देवदैठण येथील सेंट्रल बँकेमध्ये भरणा करण्याठी दुपारी 3 च्या दरम्यान दुचाकीवरून जात होते.

ढवळगाव येथील पिराच्या वळणावर मोरया हॉटेलच्या समोर पाठिमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी गाडीला ओव्हरटेक करत ढोले यांची गाडी थांबवली. काही कळण्याच्या आत त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पुड टाकली. ढोले यांनी आरडाओरड करताच त्याच्यावर पिस्तुल रोखून त्याच्या जवळील पैशाची बॅग हिसकवून घेऊन हल्लेखोर शिरुरच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक अनील कटके, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रस्त्याच्या कडेला असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पाळत ठेवून लूट

व्यवस्थापक ऐवढी मोठी रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी निघला आहे. यांची प्राथमिक माहिती हल्लेखोरांना कळाली असावी. त्यांनी पाळत ठेवून लूट केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. या घटनेनंतर परीसरात तर्कवितर्क व चर्चेला उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com