
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील नेवासा रोडवरील पंपावर डिझेल भरले मात्र, डिझेलचे पैसे न देता छोटा हत्ती घेवून एकजण पळाला. पंपावाल्याने त्याचा पाठलाग केला. मात्र पैसे देणे तर राहिलेच उलट त्या पंपावाल्यालाच चाकू लावून त्याच्या खिशातील रोकड लुटण्याचा प्रकार शहरातील नेवासा रोडवर घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्रीकांत ज्ञानेश्वर दहे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, टाकळीभान येथील श्रीकांत ज्ञानेश्वर दहे हे श्रीरामपूर बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर सेल्समन म्हणून काम करत असतात. दि. 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वा. एक छोटा हत्ती रिक्षा क्र. एमएच 20 इएल 1571 हा पंपावर आला आणि त्यावरील चालकाने 1740 रूपयांचे डिझेल गाडीत भरण्यास सांगितले. डिझेल भरल्यावर पैसे देण्याऐवजी हा चालक छोटा हत्ती घेवून संगमनेरच्या दिशेने जोराने निघून गेला. तेव्हा श्रीकांतने मोटारसायकलवर घेवून पाठलाग केला तर खल्लास करून टाकील, अशी धमकी देवून निघून गेला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात टाकळीभान येथील श्रीकांत ज्ञानेश्वर दहे यांनी फिर्याद दाखल केली असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वरील छोटा हत्ती रिक्षावरील चालकाविरोधात भादंवि कलम 394 नुसार श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.