कायम दुष्काळी ते अतिवृष्टीग्रस्त पाथर्डी तालुका

जलसंधारण, जलयुक्त शिवारने तालुक्याचा कायापालट
कायम दुष्काळी ते अतिवृष्टीग्रस्त पाथर्डी तालुका

- नारायण पालवे

एकेकाळी राज्यभर कायम दुष्काळी व उसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्याची दुष्काळी तालुका ही ओळख आता पुसली जात असुन अतिवृष्टीचा तालुका म्हणून जिल्ह्यासह राज्यभर नवीन ओळख निर्माण झाली आहे.

तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण दरवर्षी वाढतच असून यापुर्वी दरवर्षी सरासरी 550 ते 575 सरासरी च्या आसपास पर्जन्यमान असलेल्या पाथर्डी तालुक्यात यावर्षी मात्र 1069 पर्यंत गेले असून तालुक्याच्या इतिहासात हा आतापर्यंतच्या पर्जन्यमानाचा विक्रम झाला आहे. 70 फुटांपर्यंत गेलेली जलपातळी 10 फुटावर आली आहे. एकेकाळी तालुक्यात ऊस उपलब्ध होत नाही म्हणुन वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना सलग चार वर्षे बंद ठेवावा लागला होता. यावर्षी तालुक्यात तीन लाख मेट्रिक टन अतिरिक्त आहे. हे शक्य झाले आहे 2015 साली राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळेच.

या योजनेचा सर्वाधिक फायदा पाथर्डीसारख्या कायम दुष्काळी तालुक्याला झाला. आमदार मोनिका राजळे यांनी तालुक्यातील जलसंधारणाच्या कामासाठी मोठा निधी आणून पावसाचे वाहून जाणारे माथा ते पायथा यानुसार नियोजनबद्धरित्या पाणी अडविले. 2013 मध्ये पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक संतोष दहिफळे व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्व.शेषरावभाऊ जवरे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समिती प्राज फाउंडेशन पुणे, भारत फोर्ज पुणे यांच्या माध्यमातून शाश्वत जलस्रोत विकास कार्यक्रमातून तसेच वॉटर कप स्पर्धेतून कोरडगावसह 10 गावांत लोकसहभागातुन जलसंधारणाची मोठी कामे झाली. तालुक्यातील अनेक गावांतील नद्यांचे पुनर्जीवन करण्यात आले.

पाझर तलाव, बंधार्‍यातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आमदार मोनिका राजळे यांनी वर्षभर वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक गावात जाऊन श्रमदान केले. 2013 व 2018 च्या भयानक दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची शंभरी ओलांडणारा तालुका 2019 ते 2021 या तीन वर्षात मात्र टँकरची संख्या शुन्यावर आली आहे. यावर्षी तर संपूर्ण तालुक्यातील जलस्त्रोत एका रात्रीत ओव्हरफ्लो झाले. सर्व परिसर जलमय झाला.अनेक जलस्त्रोतांसह जमिनी व पिकांचे मोठे नुकसान झाले. कोकण, कोल्हापूर प्रमाणे विशेष बाब म्हणून भरपाई मिळावी यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना निवेदने देऊन मागणी केली.

भाजप नेत्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले तरीही शासनाने अद्यापतरी ना तातडीची मदत केली ना मागणी पूर्ण केली. राज्य सरकारने किमान नुकसान झालेल्या जलस्त्रोतांची पुन्हा दुरूस्ती करणे गरजेचे आहे.तरच तालुक्यातील पाणी पातळी टिकवून राहू शकते अन्यथा पुन्हा पाण्यासाठी दाही दिशा ही वेळ येऊ शकते. यातून हे सिद्ध होते की कायम दुष्काळी असणार्‍या पाथर्डी तालुक्याची ओळख अतिवृष्टीचा तालुका तसेच ऊसतोडणी मजुराचा तालुका ते ऊस पिकविणारांचा तालुका म्हणून नवीन ओळख राज्यभर होत असून तालुक्यासाठी भुषणावह बाब आहे.

वॉटरकपचे यश

वॉटर कप स्पर्धेत 2018 साली तालुक्यातील जोगेवाडी गावाने तालुकास्तरीय पाहिला क्रमांक, चिचोंडीने दुसरा तर तिसर्‍या क्रमांकाचे खेर्डे गावाला बक्षीस मिळाले. 2019 मध्ये कासाळवाडी या महसुली गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. अंबिकानगर गावाला दुसरा तर तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस चुंभळी गावाला मिळाले. यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com