बिबट्यांची पिले रानात सापडली म्हणून अनेकांची उडाली घाबरगुंडी, पण...

बिबट्यांची पिले रानात सापडली म्हणून अनेकांची उडाली घाबरगुंडी, पण...

हनुमंतगाव (वार्ताहर) - राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील अविनाश व विजय तुंबारे यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी चालु असताना रान मांजराची दोन पिल्ले आढळून आली. पिल्ले गुबगुबीत व मोठी दिसत असल्याने तोडणी कामगार घाबरून गेले.

सकाळीच ऊस तोडत असताना बिबट्या बांधावरुन जात असताना बघितल्यामुळे त्यांची गाळण उडाली. त्यांनी मालकाला बोलून परिस्थितीची कल्पना दिली. हनुमंतगावात बिबट्याची टोळी सक्रिय असल्याने अविनाश यांनी पद्मश्री विखे कारखान्याचे संचालिका उज्वला अशोकराव घोलप यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली व ऊसतोड कामगारांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला.

सौ. घोलप यांनी वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना सदर घटनेची कल्पना दिली. श्री. म्हस्के व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घोलप यांनी सदर ठिकाणी भेट दिली. पिलांची पाहणी करून सदर पीले रान मांजराची असल्याचा निर्वाळा दिला. तसेच श्री. घोलप, श्री. म्हस्के मालक अविनाश व विजय यांनी तोडणी कामगारा बरोबर उसाच्या शेतात हिंडून बिबट्या नसल्याचा विश्‍वास कामगारांना दिला. नंतर कामगारांनी ऊस तोडणीस सुरुवात केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com