संगमनेरातील इंदिरा गांधी गार्डन बनलयं मद्यपींचा अड्डा

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
संगमनेरातील इंदिरा गांधी गार्डन बनलयं मद्यपींचा अड्डा

संगमनेर (शहर प्रतिनिधी) - शहरातील नवीन नगररोड लगत असणारे इंदिरा गांधी गार्डन सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. या गार्डनमध्ये दररोज रात्री अनेक मद्यपी व गांजा पिणारे युवक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने हे गार्डन त्यांचा अड्डा बनला आहे. यामुळे भांडणाचे एक नवीन केंद्र बनले आहे. मद्यपींच्या दररोजच्या त्रासामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहरातील नवीन नगररोड लगत काही वर्षांपूर्वी हे गार्डन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळाही बसविण्यात आला आहे. या गार्डन कडे पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. गार्डनच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असते. रात्री या ठिकाणी अंधारही असतो याचा गैरफायदा अनेक युवकांनी घेतला आहे. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या भिंतीला पाठ टेकवून अनेक मद्यपी दारूचा आस्वाद घेताना दिसत आहे.

होलसेल दुकानातून दारू आणायची व या गार्डन मध्ये येऊन प्यायची असा या दारुड्यांचा नित्यक्रम ठरलेला आहे, या ठिकाणी दारुड्यांसोबतच गांजा पिणारे अनेक युवक बसलेले असतात. मद्याच्या धुंदीमध्ये या युवकांमध्ये अनेकदा भांडणाचे प्रसंग निर्माण होतात. दोन दिवसापूर्वी या ठिकाणी कडाक्याचे भांडण झाले होते. या गार्डन परिसरात शहरातील वेगवेगळ्या भागातील युवक येऊन बसतात. या ठिकाणी होणार्‍या भांडणाचा परिणाम शहरातील दुसर्‍या भागात होताना दिसत आहे. या गार्डनकडे पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

गार्डन परिसरात रात्रीच्या वेळी सुरू असणार्‍या दारूच्या पार्ट्याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. पोलीस अधिकार्‍यांनी रात्रीच्या वेळेस या ठिकाणी येऊन दारुड्यांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com