सकारात्मक चर्चेत कर्मचार्‍यांचे समाधान!

दोन दिवसांचा संप स्थगित: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सकारात्मक चर्चेत कर्मचार्‍यांचे समाधान!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. वरिष्ठ पातळीवर मुंबईत बैठक होऊन उपमुख्यमंत्री यांनी संबंधित प्रश्न सोडविण्यास सकारात्मक भूमिका घेतल्याने दोन दिवसाचा संप बुधवारी दुपारी स्थगित करण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल, भूमीअभिलेख, जिल्हा रुग्णालय परिचारिका, आयटीआय, हिवताप निवारण विभाग, बँक कर्मचारी, कोषागार कार्यालय, पाटबंधारे तसेच शहरातील सरकारी, निमसरकारी विभागातील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर झालेल्या आंदोलनप्रसंगी समितीचे जिल्हा निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, श्रीकांत शिर्शिकर, भाऊसाहेब डमाळे, विलास पेद्राम, संदीपान कासार, विजय काकडे, बाळासाहेब वैद्य, सुरेखा आंधळे, सर्वेश्वर वैकर, भाऊसाहेब थोरात, ज्ञानेश्वर कांबळे, पोपटराव कोळपकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात उपस्थित कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करून राज्य सरकार व संघटनेची भूमिका विशद केली.

समन्वय समितीच्यावतीने बुधवार 23 व गुरुवार 24 फेब्रुवारी या दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली होती. करोना महामारीच्या संकटात आरोग्य व इतर विभागातील राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक यांनी महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडले. राज्याची आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी व इतर विकास कामे मार्गी लावण्यासाठी बहुमोल योगदान दिले. गेल्या दोन वर्षातील शासनाचे प्राधान्य करोनाचे प्रादूर्भाव रोखण्यासाठी होते. त्यामुळे त्या काळात कर्मचारी शिक्षक संघटनांनी आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी कोणत्याहीप्रकारे आक्रमकतेचे धोरण न स्विकारता शासनाला शंभर टक्के सहकार्य केले. राज्यातील एकंदर परिस्थिती आता सुधारत आहे. करोना काळात राज्य शासनाला सहकार्य करणारे कर्मचारी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करून ते त्वरीत सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हा संप पुकारण्यात आला होता.

या सर्व प्रश्नांवर मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना बोलावून चर्चा केली. त्यांनी राज्य सरकार प्रश्न सोडविण्यास सकारात्मक असल्याचे स्पष्ट करून, संप स्थगित करण्याबाबत सूचना केल्या. बुधवारी दुपारनंतर संप स्थगित झाल्याने आंदोलक पुन्हा कामावर हजर झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com