पेन्शन अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन
सार्वमत

पेन्शन अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू : तिसर्‍या टप्प्यासाठी शिक्षक परिषद सज्ज

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शालेय शिक्षण विभागाने 10 जुलै रोजी अधिसूचना काढून शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नियम 19 आणि 20 नुसार मिळणारी पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचा अधिकार काढून घेणारी अधिसूचना प्रसिध्द करून कर्मचार्‍यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे. ही अधिसूचना रद्द करण्यासाठी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला.

मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य शिक्षक परिषद तीसर्‍या टप्प्यातील राज्यव्यापी आंदोलनास सज्ज झाली असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली. या तिसर्‍या टप्प्यातील अन्नत्याग आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केले आहे.

शालेय शिक्षण विभागात सेवेपश्चात मिळणारी पेन्शन कायम स्वरुपी नाकारली जाणार आहे. या विरोधात राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या वेबीनारवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत या सुधारणेचा तीव्र निषेध व्यक्त करून 3 टप्प्यांत आंदोलने करण्याचे ठरले होते. पहिल्या टप्प्यात राज्यभरात हजारो शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून 20 जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या.

दुसर्‍या टप्प्यात शिक्षक असलेले एकमेव शिक्षक आमदार नागो गाणार यांनी 18 जुलैला हक्कभंगाची नोटीस दिली आहे. तसेच22 ते 24 जुलै या टप्प्यात राज्यभरात 36 जिल्ह्यांत अधिसूचना रद्द करण्यासाठी तालुका-जिल्हा शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 22 जुलैला राज्यव्यापी आंदोलनाची नोटीस आमदार गाणार यांनी दिली होती. तर राज्यपालांना पत्र देऊन हस्तक्षेप करण्याची विनंती देखील केली होती.

यासंदर्भात शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, महिला आघाडी राज्य प्रमुख पूजाताई चौधरी, कार्यवाह नरेंद्र वातकर, यांच्यासह राज्यव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे, बाबसाहेब काळे, सुनील पंडित, मुंबई विभागात उल्हास वडोदकर, शिवनाथ दराडे, मराठवाडा विभागात किरण बावठणकर, अमरावती विभागात राजकुमार बोनकीले, पुणे विभागात जितेंद्र पवार, नागपूर विभागात आ. गाणार तिसर्‍या टप्प्यातील आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे शिक्षक परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com