अहमदनगर (प्रतिनिधी) -

सावेडी उपनगरासाठी असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यात दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. अपुरे कर्मचारी, वाढते गुन्हे

यामुळे प्रलंबित गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी व पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी गुन्ह्याचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात मंडप टाकून कामकाज सुरू केले आहे. परंतु, पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी बसत नसल्याचे एकंदरित चित्र दिसत आहे.

उच्चभ्रू लोकांची वसाहत म्हणून नव्याने विकसित होत असलेल्या सावेडी उपनगराची जबाबदारी तोफखाना पोलीस ठाण्याकडे आहे. चोर्या, घरफोड्या, जबरी चोरी, दरोडा, सोनसाखळी चोरी अशा घटना तोफखाना पोलीस ठाण्यात नेहमीच घडत असतात. यामुळे जिल्ह्यात तोफखाना गुन्ह्याच्या बाबतीत एक नंबरचे पोलीस ठाणे झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात संख्याबळ कमी पडत आहे. एक निरीक्षक, चार सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व सुमारे 100 कर्मचारी सध्या काम करतात. साप्ताहिक सुट्ट्या, आजारपण यामुळे काही कर्मचारी गैरहजर असतात. गुन्हे वाढत असल्याने गुन्हे निकाली काढण्यासाठी अधिकार्यांसह कर्मचार्यांना वेळ मिळत नाही. यामुळे प्रलंबित गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी पोलिसांनी त्यावर काम करणे आवश्यक आहे. परंतु, पोलिसांकडून तसे होताना दिसत नाही. सकाळची हजेरी झाल्यानंतर काही पोलीस कर्मचारी ठाण्यातून कामानिमित्त गायब होतात. प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी तोफखाना पोलिसांनी 19 फेब्रुवारीपासून ठाण्याच्या आवारात मंडप टाकला आहे. मंडपात एक अधिकारी व इतर पोलीस कर्मचार्यांनी बसून गुन्हे निकाली काढण्यासाठी काम करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिल्या आहेत. मात्र, पोलीस कर्मचारी काहीतरी काम काढून पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतात. यामुळे मंडपात कोणी बसत नाही. यामुळे प्रलंबित गुन्हे निकाली निघतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिकारी करतात काम, कर्मचारी होतात गायब

पोलीस ठाण्यात एक निरीक्षक, चार सहायक निरीक्षक व दोन उपनिरीक्षक आहे. तोफखाना हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे या अधिकार्यांना विभागानुसार काम दिले आहे. चितळे रोड, बालिकाश्रम रोड, गुलमोहर रोड, सावेडी, मंगलगेट अशा पोलीस चौक्या निर्माण केल्या आहेत. पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात चालू गुन्हे, प्रलंबित गुन्ह्यावर काम करत असतात. मात्र, सकाळी हजेरी झाल्यानंतर बरेच कर्मचारी काहीतरी काम काढून पोलीस ठाणे सोडतात, ते पुन्हा लवकर पोलीस ठाण्यात फिरकतच नाही,असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.