शासकीय नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा - मनोज पाटील

करोनाबरोबर जगणे सर्वांनी शिकले पाहिजे ; श्रीरामपुरात शांतता समितीची बैठक
शासकीय नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करावा - मनोज पाटील

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना रुग्ण कमी झाले आणि लॉकडाऊन शिथील केला याचा अर्थ करोना संपला, असे नाही. अजून चार ते पाच वर्षे करोना नाहिसा होत नाही. त्यासाठी सर्वांनी करोनाबरोबर जगणे शिकले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवही शासनाने घालून दिलेले नियम व अटी पाळूनच साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

श्रीरामपूर, राहाता व श्रीरामपूर तालुक्याची शांतता समितीची बैठक शहरातील प्रशासकीय इमारतीत पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, कोपरगावचे पोलीस निरीक्षक श्री. देसले, शिर्डीचे पोलीस निरीक्षक श्री. पाटील, राहात्याचे पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड, श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुक्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस निरीक्षक श्री. बोरसे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, कार्यक्रम साजरे करण्यास हरकत नाही. परंतु योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयाचे मनुष्यबळ स्थानिक पोलीसबळ वाढीसाठी नेमले आहे. सण-उत्सव काळात समाजाने समाजाची जबाबदारी घ्यावी. गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी प्रास्ताविकात शासनाने घालून दिलेले सर्व नियम मंडळांनी पाळावेत. नियम मोडल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी करोनाचे नियम पाळणे बंधनकारकच आहे. गणेशोत्सव काळात करोना रुग्णांची संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, गणेशोत्सव काळात दरवर्षी पालिकेच्यावतीने सगळ्यांनाच सहकार्य केले जाते. याहीवर्षी तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी नाही किमान पुढील वर्षी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, गणेशोत्सव काळात शांतता कमिटीच्या बैठकीत मांडलेल्या सूचनांची नोंद घेतली जात नाही. सलग दुसर्‍या वर्षी गणेशोत्सव सर्व नियम पाळूनच साजरा व्हावा.

यावेळी मनोज नवले, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, कुणाल करंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय छल्लारे, डॉ. दिलीप शिरसाठ, भरत मोरे, राहात्याचे रौफ मौलाना, अहमदभाई जहागिरदार, कोपरगावचे जितेंद्र बनसोड यांनी विविध सूचना मांडल्या.

अशा उत्सव काळात राजकीय लोकांना वेगळी वागणूक आणि आमच्या सारख्या धार्मिक लोकांना वेगळी वागणूक दिली जाते. आम्हाला अशी वेगळी वागणूक का दिली जाते. सर्वांना समान वागणूक द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा जो आदर्श आहे तो आमच्याासारख्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. अशा कार्यात लोकांचा सहभाग मोठा असावा ही संकल्पना खूप चांगली होती. असे राहात्याचे मौलाना रऊफ यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com