संवेदनशील शहर म्हणून संगमनेर शहराचा शिक्का पुसला

संवेदनशील शहर म्हणून संगमनेर शहराचा शिक्का पुसला

शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी केले कौतुक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहराची ओळख संवेदनशील शहर म्हणून अनेक वर्ष होत होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. संवेदनशील शहर म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या या शहराचा हा शिक्का पुसला आहे. राज्य पातळीवरील पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीतही संगमनेरचा नामोल्लेख संवेदनशील शहर म्हणून झाला नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

या महिन्यात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, संगमनेर शहर पोलिसांच्यादृष्टीने अनेक वर्ष संवेदनशील शहर म्हणून ओळखले जायचे. या गावात शांतता नांदत आहे, यामुळे संगमनेरची ओळख आता बदलली आहे. संगमनेरकरांनी गणेशोत्सव साजरा करताना करोनाचा प्रसार वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. या आजाराचा धोका अद्याप कमी झाला नाही. शासनाने नाईलाजाने बंधने टाकली आहेत. सर्वांनी नियमांचे पालन केले तर या आजाराला आपण हरवू शकतो. जोपर्यंत करोनाच्या संकटातून बाहेर येत नाही तोपर्यंत जबाबदारी संपणार नाही. नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी. सण, उत्सवांमध्ये बंदोबस्त लागू नये यासाठी शांतता कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. सण-उत्सवामुळे यात आणखी भर पडू नये यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सूचना केल्या. वीज वितरण कंपनीच्याा कारभारावर यावेळी सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, दीपक साळुंके, शरद थोरात, शौकत जहागीरदार, ज्ञानेश्वर थोरात, योगराज परदेशी, नगरसेवक किशोर पवार, विश्वास मुर्तडक, प्रशांत वामन आदींनी विविध सूचना केल्या.

गणेश विसर्जनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या बजरंग दल विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांना शांतता समितीच्या बैठकीसाठी आमंत्रण न दिल्याबाबत ज्ञानेश्वर थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. गणेश विसर्जनाच्या दिवशी नदीपात्रात कुणी बुडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना दीपक साळुंंखे यांनी केली. विसर्जनासाठी प्रवरा नदीला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी विश्वास मुर्तडक यांनी केली. प्रास्तविक राहुल मदने यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पारखी यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com