चोरीस गेलेल्या वाहनाची रक्कम ग्राहकास द्या; विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा आदेश

चोरीस गेलेल्या वाहनाची रक्कम ग्राहकास द्या; विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)

चारचाकी वाहन चोरीस गेल्यानंतर विम्याची रक्कम नाकारणार्‍या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चपराक दिली आहे. तक्रारदार ग्राहकास विम्याची संपूर्ण रक्कम, शारीरिक व मानसिक त्रासापोटी प्रत्येकी 10 हजार रूपये व तक्रारीचा खर्च पाच हजार रूपये देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्य चारू डोंगरे व महेश डाके यांनी या दाव्याचा निकाल दिला. या संदर्भात भरत विठ्ठल लांडे (साईलीला अपार्टमेंट, पाइपलाइन रस्ता, नगर) यांनी तक्रार दाखल केली होती. भरत लांडे यांनी एका बँकेकडून चारचाकी वाहनासाठी 12 लाख पाच हजारांचे कर्ज घेतले तसेच वाहनाचा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून 15 लाखांचा विमा उतरवला. या विम्याचा कालावधी 6 नोव्हेंबर 2017 ते 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत होता. विम्याच्या हप्त्याची 46, 256 रक्कमही त्यांनी भरली होती.

दरम्यान 29 मार्च 2018 रोजी तक्रारदार भरत लांडे यांचे वाहन ते राहत असलेल्या परिसरातून चोरीस गेले. या संदर्भात त्यांनी तोफखाना पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विमा कंपनीलाही कळवले. विमा कंपनीने विविध कागदपत्रांची मागणी केली. त्याची पूर्तताही लांडे यांनी केली. परंतु 6 मार्च 2019 रोजी विमा कंपनीने दावा नाकरल्याचे पत्र त्यांना दिले. त्यावर भरत लांडे यांनी वकील सचिन इथापे यांच्यामार्फत ग्राहक आयोगाकडे दावा दाखल केला होता.

चोरीस गेलेल्या वाहनाच्या चाव्या जमा करताना दोन चावीपैकी एक चावी डुप्लिकेट आहे व एक मूळ चावी आहे, ही बाब तक्रारदाराने लपवून ठेवली व अटीशर्तीचा भंग केला. त्यामुळे विमा दावा नाकारला असा विमा कंपनीचा बचाव आयोगाने फेटाळला. विमा कंपनीने तक्रारदार लांडे यांना विम्याची रक्कम 15 लाख रूपये व दि. 4 मे 2019 पासून रक्कम मिळेपर्यंत नऊ टक्केप्रमाणे व्याज द्यावे, तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासापूर्वी प्रत्येकी 10 हजार रुपये व तक्रारीचा खर्च 5 हजार रुपये द्यावा असा आदेश देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com