नेवासा (का. प्रतिनिधी) -

अंगणवाडी कर्मचार्यांना सेवासमाप्ती नंतर एकरकमी लाभाबरोबरच दरमहा सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) मिळावे या मागणीसाठी

काल जिल्हा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने नेवासा पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनचे वतीने नेवासा पंचायत समिती मधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके म्हणाले की, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीतर्फे अंगणवाडी कर्मचार्यांना सेवासमाप्ती नंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्तावानुसार पेन्शन योजना लागू करावी ही मागणी संघटनेने गेली अनेक वर्षापासून शासनाकडे केलेली आहे. शासनाने त्याबाबत सकारात्मक आश्वासने देवूनही काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहेत. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचार्यांना न्याय द्यावा अन्यथा मुबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी युनियनच्या अध्यक्ष मदिना शेख, सहचिटणीस कॉ.जीवन सुरुडे, मायाताई जाजू यांची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कार्यालयीन प्रमुख जयश्री जाधव यांचे मार्फत मुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्री यांना देण्यात आले. आभार सविता दंरदले यांनी मानले.

यावेळी कावेरी शिंदे, चंद्रकला विटेकर, अलका दरंदले, बेबी आदमाने, शरिफा शेख, शांता कोरडे, मंगल मिसाळ, सुषमा सोनवणे, हिरा कदम, सुनिता बोरुडे, सुशिला गायकवाड, अनिता गवळी, रंजना मारकळी, मनिषा बेलदार, अलका तांदळे आदींसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.