जहाज बुडायला लागले की सर्वच पळ काढतात...अकोलेच्या राजकारणात वर्ष दीड वर्षाच्या अंतराने याचा प्रत्यय पुन्हा येत आहे.

एकेकाळी कट्टर समर्थक असलेले माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे राजकारण बुडविण्यासाठी ज्येष्ठ शरद पवार ज्या पद्धतीने आक्रमक आहेत, त्यावरून राजकीय चर्चा वाढल्या आहेत.

एकेकाळी पवार-पिचड हे अतुट समिकरण होतं. पिचड बोलले म्हणजे पवारांचीच सुचना आहे, असाही अनेकांचा समज होता. डावा-उजवा जे काही असते, ते सर्व काही पिचड पवारांसाठी होते. काही दशकांचा त्यांचा प्रवास एकत्र आणि चढ्या क्रमाचा होता.

पवारांनीही पिचडांना काही कमी केले नाही. प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता, मंत्री अशी सत्तेची सर्व पदे पिचडांनी राष्ट्रवादीत असताना उपभोगली. नगरच्या राजकारणातही पिचडांचे ‘मातब्बर’ हे स्थान पवारांनीच निर्माण केलेलं.

वर्षानुवर्षे सत्ता स्थानात राहिलेले 2014 च्या भाजपच्या झंझावातात सत्तेतून बेदखल झाल्यानंतर कासावीस झाले. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. 2019च्या लोकसभा-विधानसभा निवडणूक काळात काँग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली गळती अभुतपूर्व होती. त्यात आपल्या प्रचारकी शैलीतून मच्छराला गरूड असल्याचे सिद्ध करण्यात भाजप पटाईत. त्यामुळे गदारोळात भलेभले पुढील राजकीय अंदाज घेण्यात चुकले.

पिचड त्यापैकीच एक. त्यांनी अचानक पवारांना सोडणे, हा धक्काच होता. ज्यांच्यावर अधिकची माया केली, त्यांनीच अर्ध्यावाटेत सोडून दिले तर क्रोध आणि शल्य अशा दोन्ही गोष्टी मस्तकात शिरतात. पवारांसाठी काहीशी अशीच स्थिती पिचडांच्या बाबतीत झालेली दिसते.

लोक सोडून जात असतानाचा काळ पवारांसाठी संघर्षाचा होता. कोणीही उपटसुंभ त्यांना आव्हान देण्याची भाषा करत होता. अशा काळात आपली माणसे सोबत राहतील, असा त्यांचा ठाम विश्वास या काळात कोसळला.

पण पुढे स्थिती बदलली. पवार पुन्हा सत्तेत आहेत. ज्यांनी पळ काढला, त्यांचा वकुब आणि ताकद त्यांना चांगलीच माहिती आहे.

राजकारणात माणसं घडविणे आणि माणसं बुडविणे याबाबत पवारांचं कौशल्य वादातीत आहे.

पवार काही दिवसांपूर्वी अकोल्यात आले होते. पिचडांचा उल्लेख त्यांनी ‘झारीतील शुक्राचार्य’ म्हणून केला, तेव्हाच पिचडांबद्दलचा राग खोलवर आहे, याचा अंदाज आला होता.

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने हा राग तसुभरही कमी झालेला नाही, याची जाणीव जिल्ह्याला झाली. सर्व गोतावळा बँकत गोळा करण्यास मुभा देणार्या पवारांनी पिचडांना तीव्र विरोध केला. मातब्बर नेत्यांनी त्यांना गळ घालूनही उपयोग झाला नाही.

उलटपक्षी त्यांच्या जवळच्या माणसांना पुन्हा राष्ट्रवादीत घेवून पिचडांचे राजकारण अधिक खिळखिळे करण्याच्या प्रयत्नांना त्यांनी वेग दिला.

सीताराम गायकर हे त्याचे ठळक उदाहरण. पवारांच्या मदतीने बँकेत पोहचलेल्या गायकरांनी पवारांच्या सल्ल्याने आपले लक्ष अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडे वळविल्याचे दिसते.

कारखान्यावर पिचडांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र यापुढे ते राहिल, याबाबत राजकीय वर्तुळात शंका आहे.

काल पिचड पवारांना सोडून गेले. सध्या पिचड समर्थक काढता पाय घेत आहेत. तालुक्यातील सत्तास्थाने अशीच गमवावी लागल्यास पिचड काय करणार? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळ देईल.