पतसंस्थेच्या कर्मचार्‍यांना मिळणार करोना विम्याचे संरक्षण

पतसंस्थेच्या कर्मचार्‍यांना मिळणार करोना विम्याचे संरक्षण

जिल्हा उपनिबंधकांचे आदेश; पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील पतसंस्था कर्मचारी यांना मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक काढून, सर्व कर्मचार्‍यांना करोनाचे विमा संरक्षण मिळण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना देण्यात आले होते.

या निवेदनाची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी सर्व पंतसंस्था कर्मचार्‍यांना विमा संरक्षणसह, करोना प्रतिबंधात्मकतेसाठी आवश्यक सुविधा देण्याचे पत्र काढले असल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी दिली.

पतसंस्था फेडरेशनने सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत पतसंस्थेच्या कामकाजची वेळ जाहीर केली. मात्र फेडरेशनला वेळेची ही नियमावली जाहीर करण्याचा अधिकार नसून, अनेक पतसंस्था कर्मचारी करोनाने बाधित होत असताना यामध्ये काही मृत्यूमुखी पडले असल्याबाबत संघटनेचे राज्य सचिव अ‍ॅड. टोकेकर, राज्य अध्यक्ष दत्तात्रय हांडे, जिल्हाध्यक्ष समीर खडके, कार्याध्यक्ष मोहन देशमुख, राजेंद्र भालेराव, कैलास वैष्णव, अनिल रोहम, अशोक वाळूंज या पदाधिकार्‍यांनी जिल्हा उपनिबंधक आहेर यांचे लक्ष वेधले.

जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारी (दि. 21) पत्रक काढले असून, यामध्ये पतसंस्था कार्यालयाची वेळ तीन तासांची निर्धारीत केली आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण करून घेणे, संस्थेच्या स्तरावर अधिकारी, कर्मचारी यांचा आरोग्य विमा उतरविणे, करोना प्रतिबंधात्मकतेसाठी मास्क, सॅनीटायझर आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, ग्राहकांना कॅशलेस व ऑनलाईन सुविधा जास्तीत जास्त पुरविण्याचे आदेश पतसंस्थांना पत्राद्वारे दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com