पाथरे बुद्रुक व हनुमंतगावसाठी 27.25 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

पाथरे बुद्रुक व हनुमंतगावसाठी 27.25 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

जलजीवन मिशन अंतर्गत राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक व हनुमंतगाव या दोन गावांसाठी सुमारे 27 कोटी 25 लक्ष रुपये खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे व त्यांच्या विशेष प्रयत्नातून या योजनेस मान्यता मिळाली असल्याची माहिती पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप यांनी दिली.

या योजनेच्या माध्यमातून जुन्या साठवण तलावाच्या जागी 66 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन आरसीसी साठवण तलाव बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता वाढेल. पर्यायाने कालव्याच्या पाण्यातून एकाच वेळी अधिक पाणी म्हणजे दोन महिने पाणी पुरविता येईल एवढे पाणी साठविता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे ते दीर्घ काळ वापरता येऊ शकते. तसेच उन्हाळ्यात पाणी प्रश्न भेडसावणार नाही. या साठवण तलावाच्या शेजारी प्रतिदिन 15 लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प राहणार असून शुद्ध झालेले पाणी याठिकाणी बांधण्यात येणार्‍या सव्वादोन लाख लिटर क्षमतेच्या एम.बी.आर.मध्ये साठविण्यात येणार आहे.

साठवण तलाव ते पाथरे बुद्रुक तसेच साठवण तलाव ते हनुमंतगाव या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र 6 इंची मजबूत एसडीपी पाईपची पाईपलाईन करण्यात येणार असून या पाईपलाईनची लांबी अंदाजे 12 किलोमीटर असणार आहे. पूर्वी साठवण तलावावरून एकाच लाईनद्वारे दोन्ही गावाला पाण्याची विभागणी केली होती. एक लाईन असल्यामुळे दोन्ही गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जायचा. आता या योजनेतून दोन्ही गावांनी स्वतंत्र 6 इंची पाईपलाईन येणार असल्यामूळे दररोज पाणीपुरवठा करता येईल.

पाथरे बुद्रुक गावासाठी 1 लाख 84 हजार लिटर क्षमतेची ओव्हरहेड पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. हनुमंतगावसाठी 64 हजार लिटर क्षमतेची ओव्हरहेड पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. हनुमंतगावमध्ये काही वर्षांपूर्वीच नवीन सव्वा लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे.

दोन्ही गावातील गावठाण तसेच प्रत्येक वाड्यावस्त्यांपर्यंत पिण्याचे पाणी 3 इंची पाईपलाईनद्वारे देण्यात येणार असून अंदाजे 37 किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात येणार आहे.

पाथरे बुद्रुक येथे नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित व्हावी अशी येथील जनतेची अपेक्षा होती. जुन्या योजेनेतून पाथरे बुद्रुक गावठाणापुरता पाणीपुरवठा करता येत होता. वाड्यावस्त्यांवर ही योजना नव्हती. आता नवीन योजनेमुळे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचणार आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे या योजनेस मान्यता मिळाली आहे. त्यांनी याकरिता वारंवार पाठपुरावा केला. गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविल्याबद्दल दोन्ही गावांतील ग्रामस्थ त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत.

- उमेश घोलप, सरपंच, पाथरे बुद्रुक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com