पॅथॉलॉजी लॅबमधील साहित्याची परस्पर विक्री; डिपॉझिटही हडपले

16 लाखांची फसवणूक; चौघांविरूध्द गुन्हा
पॅथॉलॉजी लॅबमधील साहित्याची परस्पर विक्री; डिपॉझिटही हडपले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या पॅथॉलॉजी लॅबमधील सहा लाख 56 हजार 500 रुपयांच्या साहित्याची परस्पर विक्री केली. तसेच डिपॉझिट म्हणून ठेवलेले 10 लाख रुपयेही परत न दिल्याने चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॅबचे मालक अक्षय दत्तात्रय ढवळे (वय 28 रा. मांजरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भालचंद्र अशोक साळवे (रा. वनकुटे ता. पारनेर), डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (रा. सोईट धानोरा सालदेव, जि. यवतमाळ), सचिन गुंजाळ व आयशा सय्यद (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांचा समावेश आहे. फिर्यादी अक्षय ढवळे रक्त, लघवी तपासणीचे कामकाज करतात. त्यांना डॉ. बंडगर यांनी सांगितले की,‘मी नगर येथे सुविधा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल भागिदारीमध्ये चालु केले आहे. तू माझे भागीदार भालचंद्र साळवे, सचिन गुंजाळ, आयशा सय्यद यांचे सोबत बोलून त्याठिकाणी पॅथोलॉजी लॅब चालू कर’, असे सांगितल्याने ढवळे यांनी 13 ऑक्टोबर, 2021 रोजी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी भालचंद्र साळवे, डॉ. रामेश्वर बंडगर यांच्यासोबत पाच वर्षाचा करारनामा करून चेकद्वारे सहा व चार लाख रोख रक्कम डीपॉझीट देवून हॉस्पिटल येथे पॅथॉलॉजी लॅब सुरू केली.

या लॅबमध्ये अक्षय यांनी 13 जानेवारी, 2022 रोजी सहा लाख 56 हजार 500 रुपयांचे साहित्य ठेवले होते. 4 मार्च, 2022 रोजी काही अंतर्गत वादामुळे सुविधा हॉस्पिटल बंद झाले होते. त्यावेळी अक्षय यांनी लॅबमधील साहित्य काढून घेण्यासाठी विचारणा केली असता डॉ. बंडगर, साळवे, गुंजाळ यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व अक्षय यांना न सांगता करारनामा रद्द केला. अक्षय हे 24 एप्रिल, 2022 रोजी सुविधा हॉस्पिटल येथे लॅबमधील साहित्य घेण्यासाठी गेले असता त्यांना तेथील सुपरवायझर बबन वाटोळे यांनी सांगितले की,‘हॉस्पिटलमधील सर्व सामान व वस्तू भालचंद्र साळवे हे घेऊन गेले आहेत’. आपली फसवणूक झाल्याचे ढवळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com