
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डीतील सोनेचांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची घटना आज (दि.23) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.24) व्यापारी व सर्वपक्षिय पदाधिकार्यांनी पाथर्डी बंदचे आवाहन केले आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नवी पेठेतील सोनेचांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे गुरूवारी रात्री दुकान बंद करून अर्जुना लॉन्स च्या पाठीमागे असलेल्या आपल्या घरी जात होते. त्यांना रस्त्यात मध्येच अडवत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर धादार शस्त्राने खुनी हल्ला करून त्यांच जवळ असलेली सोन्याचा दागिण्यांची पिशवी पळवविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत चिंतामणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरीकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या चारचाकी वाहनाने अहमदनगरला तात्काळ हलविण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड. प्रताप ढाकणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. झालेल्या घटनेवर चिंता व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
यावेळी सराफ संघटनेचे राजेंद्र शेवाळे, बाळासाहेब जिरेसाळ, सुनील भांगे, संजय दराडे, सुनील मानूरकर, मोदक शहाणे, मधुकर मानूरकर, बाळासाहेब जोजारे तसेच माजी नगरसेवक बंडू बोरुडे, चांद मणियार, मुकुंद गर्जे,अ मोल गर्जे, नासीर शेख, किशोर परदेशी, धरमचंद गुगळे, चांदमल देसरडा यांच्यासह शेकडो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत चिंताणी यांची भेट घेतली. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत स्पॉट पंचनामा करत हल्लेखोरांचा शोध घेतला. याबाबत उशिरापर्यंत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.