पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

चार चोर्‍यांमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास
पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चार चोरीच्या घटनांत एक लाख एक्केचाळीस हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

जिरेवाडीच्या गहिनीनाथ आंधळे यांच्या सहा शेळ्या, पाथर्डी शहरातील अण्णा हरेर यांची गावरान गाय व कौडगाव आठरे येथील किशोर पवार यांचे 70 डाळिंब फळांचे कॅरेट चोरट्यांनी चोरले आहेत. पोलिसांनी चोरीचे चार गुन्हे दाखल केले आहेत. जिरेवाडी येथील गहिनीनाथ आंधळे यांच्या सहा शेळ्या 23 जुलै 2022 रोजी रात्री गोठ्यातून चोरून नेल्या. आंधळे यांच्या घराला बाहेरून कडी लावून चोरटे पसार झाले. एकतीस हजार रुपये किमतीच्या सहा शेळ्या चोरीला गेल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शहरातील अण्णा हरेर यांच्या गोठ्यातील विस हजार रुपये किमतीची गावरान गाय 23 जुलै 2022 च्या रात्री चोरीला गेली. त्यांची दोन वासरेही यापूर्वी चोरीला गेले होते. त्याची तक्रार दिलेली नव्हती.कौडगाव आठरे येथील शेतकरी किशोर धोंडीबा पवार या शेतकर्‍यांच्या शेतातील तोडायला आलेली सत्तर कॅरेट डाळिंब सत्तर हजार रुपये किमतीचे अज्ञात चोरट्यांनी 22 जुलै 2022 रात्री चोरून नेली. पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

आडगाव येथील नसरुद्दीनबाबा मंदिरातील दोन दानपेट्या फोडून पंधरा ते विस हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरला आहे. पुजारी अल्लाउद्दीन फकीरभाई शेख यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.याप्रकरणी आडगाव येथील रामा उर्फ रामदास मोहन ढेकळे याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ढेकळे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 2230 रुपये जप्त करण्यात आले आहेत.त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

चोरटे पकडण्यात अपयश

तालुक्यात आठवडाभरात सात ठिकाणी चोरीचे प्रकार घडले.लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला.यामध्ये पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.चोरीच्या प्रकरणातील चोरटे अटक झाले तर पुढील गुन्हे रोखता येतात.दुर्दैवाने पोलिसांना आरोपी सापडत नाहीत याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.जिल्हा पोलीस अधिक्षकांनी यामध्ये लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com