पाथर्डी तालुक्यात पुन्हा एमआयडीसीच्या लढ्याचा एल्गार

जनजागृती आंदोलनास आजपासून प्रारंभ
पाथर्डी तालुक्यात पुन्हा एमआयडीसीच्या लढ्याचा एल्गार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्याच्यादृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा व भवितव्याच्यादृष्टीने प्रलंबित असलेला दुर्लक्षित केला गेलेला एमआयडीसीच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी लढ्याचा एल्गार आज करण्यात आला.

या जनजागृती आंदोलनाची सुरुवात पाथर्डी येथील वसंतराव नाईक चौकात शुभारंभ करून करण्यात आली. तालुक्याच्या पूर्व भागातील युवा कार्यकर्ता पंकज पालवे यांनी पुढाकार घेऊन एमआयडीसी व्हावी याकरिता आपल्या खांद्यावरती जनजागृतीची धुरा घेतली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनील पाखरे, नागनाथ गर्जे, किसन आव्हाड, रामनाथ चव्हाण यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या आंदोलनासाठी वचनबद्ध राहण्याची हमी दिली. एमआयडीसी कृती समिती स्थापन करत असून या कृती समितीचे अध्यक्षपद तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख यांनी स्वीकारावे ,असा ठराव मांडला त्या सर्वांनी एकमताने अनुमती दिली.

यावेळी किसन आव्हाड म्हणाले, शासन जाणून बुजून पाथर्डी तालुक्यातील लोकांवर अन्याय करत असून यापुढे आता आम्ही आमच्या प्रश्नासाठी सर्वजण मिळून संघर्ष करत राहू, एक दिलाने एकमताने संघर्ष केला जाईल. कृती समिती अध्यक्ष नासिर शेख म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन विश्वासाने हे आंदोलन उभारले जाईल. सर्व पातळीवर तांत्रिक बाजूचा अभ्यास करून प्रशासकीय, राजकीय, सामाजिक पातळीवर हे आंदोलन उभारू.पाथर्डी तालुका अत्यंत दुर्गम असून डोंगराळ व दुष्काळी आहे.

येथील सुशिक्षित बेरोजगार हा रोजगारासाठी पूर्ण राज्यांमध्ये सैरावैरा पळतो, येथील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न,लोकांच्या व्यवसायांचा प्रश्न, व्यापार व नोकर्‍यांचा प्रश्न एमआयडीसीमुळे मार्गी लागेल.तालुक्यामध्ये एमआयडीसीला पोषक वातावरण आहे. तालुक्यामधून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग हे जात असून पाण्याची उपलब्धता मोहरी तलाव आणि जायकवाडीच्या पाण्याच्या माध्यमातून होऊ शकते.तालुक्यामध्ये कच्चामाल अत्यंत सहजरित्या उपलब्ध होतो. जोपर्यंत तालुक्यात एमआयडीसी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण स्वस्थ बसणार नाही.

याप्रसंगी नागनाथ गर्जे, प्रा.जालिंदर काटे, रवी पालवे,जुनेद पठाण, सुनील दौंड,गणेश दिनकर,सचिन नागापुरे, सुरेश हुलजुते ,विकास दिनकर ,बबन बांगर, सोमनाथ कराड, केशव खेडकर, दर्शन दरेकर, सचिन एकनाथ पालवे, प्रवीण पालवे,संकेत पालवे, गणेश ढाकणे, बाळासाहेब पालवे, दत्ता पालवे, सुनील ढाकणे आदी उपस्थित होते.

वेळप्रसंगी हुतात्मा होऊ

आंदोलनासाठी वेळप्रसंगी हुतात्मा होण्याची वेळ आली तरी डगमगणार नाही. तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आमचा कोयता आम्हाला दूर करावयाचा आहे. पोटापाण्यासाठी खूप दूरवर जावे लागते त्यामुळे हा तालुक्याच्यादृष्टीने जीवन मरणाचा प्रश्न आहे, असा निर्धार यावेळी सामाजिक नेते सुनील पाखरे यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com