पाथर्डीत दहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू

तालुका प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
पाथर्डीत दहा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या 6 ते 16 मे दरम्यान संपूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यू जाहीर करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या तालुका प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला. तहसील कार्यालयात या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण होते. यावेळी तहसीलदार शाम वाडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नायब तहसीलदार पंकज नेवसे, गटविकास अधिकारी शीतल खिंडी, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलीस निरिक्षक अरविंद जोंधळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पालवे, नगरसेवक महेश बोरुडे, डॉ.रमेश हंडाळ उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत दिवसेंदिवस तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून या विषयावर सध्या ज्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

त्याचा उपयोग होत नसल्याने कडक लोकडॉऊन करण्या शिवायपर्याय नाही अशी सूचना तहसीलदार वाडकर यांनी मांडली. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला. सद्य परिस्थितीत शनिवार व रविवार वगळता इतर दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, दूध विकण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या वेळेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी रस्त्यावर जमा होत असल्याने करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नव्हती.

यामुळे 6 ते 16 मे पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत आता दूध विक्रेत्यांना एकाच ठिकाणी थांबून दूध विक्री करता येणार नाही. तर किराणा दुकाने व भाजीपाल्याची दुकानेही लावता येणार नाहीत. मात्र मेडिकल, दवाखाने व हॉस्पिटल सुरु ठेवण्यात येणार असून अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून शहरातील ज्या व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे.

त्या व्यक्तीचे नाव पालिका प्रशासनाला कळवण्यात येणार असून ज्या प्रभागात असा रुग्ण आढळून आला त्याला करोना केअर सेंटरमध्ये किंवा हॉस्पिटल मध्येच उपचार घेण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याशिवाय जनताकर्फ्यूच्या काळात अनेक वेळा रूट मार्च काढण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com