
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्याच्या पुर्व भागात टाकळीमानुर महसुल मंडळ परिसरात वादळी पाऊस व वादळी वार्याने तडाखा बसला आहे. शनिवारी (दि.8) झालेल्या वादळी वार्यात ठोंबरे वस्ती येथील बलभीम बर्डे यांच्या राहत्या घराचे पत्र उडून गेले असून यात पडझड होऊन घराचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे बर्डे यांचा संसार उघड्यावर पडला आहे.
गारपिटीने या परिसरातील ठोंबरे वस्ती, मंचरवाडी, तांबेवाडी, टाकळीमानुर, आकोला, येळी, मोहज देवढे, जांभळी, पालवेवाडी, शेकटे भागातील शेतकर्यांच्या शेती पिकाचे व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाले आहे. वादळी वार्याने आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडला. तर अन्य फळबागांचेही नुकसान झाले आहे. कांदा, बाजरी, काढणीला आलेला गहू आदी पिकांचे झालेल्या गारपिटीने नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
शनिवारी सायंकाळी अचानक जोराच्या वार्यासह गारांचा पाऊस सुरू झाल्याने शेतकर्यांची चांगलीच धावपळ उडाली. वादळी वार्याने ठोंबरे वस्तीवरील गरीब कुटुंब असलेल्या बलभीम बर्डे यांचे राहते घर त्याचे पत्रे काही क्षणात वादळाने उडून गेले आहेत. तर घराच्या भिंती पडल्याने घरातील संसार उपयोगी वस्तू व सामानाचे नुकसान झाले आहे. चिंचपूर पांगुळ या भागातही काही प्रमाणत गारपीट झाल्याचे माहिती समजली आहे.
मागील महिन्यातही कुत्तरवाडी, चिंचपूर इजदे, पिंपळगाव टप्पा या परिसरात गारांचा पाऊस झाला होता त्यातही मोठ्या प्रमाणात शेतकर्यांच्या शेती पिकांचे व फळबागांच्या नुकसानी झाले होते. यातून येथील शेतकरी सावरत असतानाच पुन्हा अवकाळीने नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.