पाथर्डी शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

निवडणुकीच्या तोंडावरील प्रकाराने कार्यकर्ते संभ्रमात
पाथर्डी शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना तालुकाप्रमुखांनी घेतलेल्या बैठकीवर शहरप्रमुखांनी आक्षेप घेतल्याने सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेतील शहर व तालुका गटबाजी उफाळून आल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

शिवसेना पक्षश्रेष्ठींचा जो आदेश येईल त्या पद्धतीने नगरपालिका निवडणूक लढवली जाईल. तसेच जोपर्यंत पक्षीय पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक पातळीवर नेत्यांनी नगरपालिका निवडणुकीबाबत बोलू नये व परस्पर निर्णय घेऊ नये. निवडणूक स्वबळावर लढवायची आहे की, महाविकास आघाडी बरोबर याचा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जाईल, असे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचे शिवसेनेचे पाथर्डी शहरप्रमुख राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देणार्‍या शिवसेनेत नगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वीच शिवसेनेत तालुका व शहर असे दोन गट तयार झाले आहेत.

शहरात जेमतेम ताकद असणार्‍या शिवसेनेत नगर पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत बैठक घेण्यावरून वाद उफाळून आला असून तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी घेतलेल्या बैठकीला शहरप्रमुखांनी दांडी मारली. या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून शिवसेना स्वबळावर पालिका निवडणूक लढविणार असल्याचे असल्याचे तालुका प्रमुख अंकुश चितळे यांनी सांगितले तर शहरप्रमुख सागर राठोड यांनी पत्रक काढून स्वबळ की आघाडी याचा निर्णय शिवसेनेचे वरिष्ठ नेते घेतील तो मान्य करू असे सांगितले. या पत्रकबाजीमुळे सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

चितळे यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या बैठकीसाठी मला निमंत्रण दिले नाही. तालुकाप्रमुख पक्षाचे संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. पालिका निवडणूक शहरासाठी असल्याने शहरप्रमुख म्हणून माझ्याशी कुठलीही चर्चा न करता व विश्वासात न घेता मला माझ्या अधिकारापासुन वंचित ठेवूून तालुका प्रमुख शहरातील निर्णय घेतात.

- सागर राठोड, शिवसेना पाथर्डी शहरप्रमुख

शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांची मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. तेव्हापासून तालुकाप्रमुख म्हणून मला त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नाही. आगामी निवडणुकीत नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या आहेत. मी स्वतः शिवसेना शहर प्रमुखांना या बैठकीचे निमंत्रण दिले होते मात्र ते गैरहजर राहिले.

- अंकुश चितळे, शिवसेना पाथर्डी तालुकाप्रमुख

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com