पाथर्डी तालुक्यात विक्रमी 193 मिमिमीटर पावसाची नोंद

तालुका जलमय : शेतीचे नुकसान, पाथर्डी शहरात अनेकांना फटका
पाथर्डी तालुक्यात विक्रमी 193 मिमिमीटर पावसाची नोंद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार पावसाने हाहाकार उडाला असून संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पावसाचा सर्वाधिक फटका कोरडगाव, कळसपिंप्री, पागोरी पिंपळगाव या गावांना बसला आहे. ही तीन गावे सध्या पूर्णपणे जलमय झाली आहेत. तालुक्यात 40 वर्षांत पहिल्यांदा एकाच दिवशी 193 मिलीमिटर पावसाची नोंद झालेली आहे.

दरम्यान, आतापर्यंत कोरडेठाक असलेले घाटशीळ, पारगाव, कुत्तरवाडी, मोहरी, शिरसाठवाडी तलाव पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अनेक गावांमध्ये नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. झालेल्या पावसाने पिकांसह रस्ते व पुलांचे देखील मोठे नुकसान झाले असून आ. मोनिका राजळे यांनी कोरडगावला सकाळीच भेट देऊन नुकसानीची पाहणी करून तालुका प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. सोमवारी पाथर्डी शहर व तालुक्यात जोरदार हजेरी लावत सर्वत्र हाहाकार केला. यात कोरडगाव येथे म्हशीचा व अकोला येथे गायीचा मृत्यू झाला. तसेच रुपनरवाडी येथील बाबासाहेब सुखदेव रुपनर यांच्या सहा शेळ्या पाण्यात वाहून गेल्या.

अकोला येथील चंदू शेख यांच्या एक गायीचा मृत्यू व चार शेळ्या मरण पावल्या तसेच राजू सय्यद, रज्जू शेख व उस्मान शेख यांच्याही शेळ्या वाहून गेल्या. तसेच त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. मोहोज देवढे, हाकेवाडी, बहिरवाडी, काळेवाडी, अकोला, पालवेवाडी येथील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य व संसारोयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या.पावसाने दातीरवाडी येथील दोन व धायतडकवाडी येथील तीन मातीचे नालाबांध फुटल्याने मोठे नुकसान झाले. कारेगाव, शेकटे, फुंदेटाकळी, येळी, जिरेवाडी, येळी, कोळसांगवी, औरंगपूर, तोंडोळी, फुंदेटाकळी, शेकटे, वाळुंज, मोहटे, करोडी, चिंचपूर इजदे परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले.

तसेच पाथर्डी शहरातील नगररोड, शेवगावरोड यासह विविध ठिकाणच्या तळ मजल्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. कोरडगाव चौकातील भानुप्रयाग लॉजमधील सहा दुकानांत पाच-सहा फुटापर्यंत पाणी शिरले होते. तसेच बाजूच्या एका हॉस्पिटलमधल्या तळ मजल्यात पाणी शिरल्याने एक्सरे मशीनसह इतर मशीनचे मोठे नुकसान झाले.लगतच्या दोन-तीन मेडिकल दुकानांत देखील पाणी शिरल्याने नुकसान झाले. नाथनगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरायला लागल्याने नागरिकांनी एसटी डेपोची भिंत पाडून पाण्याला वाट करून दिली. तसेच शहरातील परीट नदीला पूर आल्यामुळे वाहतूक चार तास बंद होती. शेवगाव रोडवरील दोन कॉम्प्लेक्स मध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.

तळ मजल्यावरील पाणी बाहेर काढण्यासाठी सर्वच दुकानदारांना सकाळी सकाळीच पाणी उपसा मोटार, जनरेटरसाठी धावाधाव करावी लागली. अनेकांना तळ मजल्यात घेतलेल्या गाळ्यांमुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. यामध्ये व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. पालिकेचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांनी शहरातील नुकसानीची पाहणी केली. सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरडगाव येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

आ. राजळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जि.प.सदस्य राहुल राजळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेनेचे विधानसभा संघटक भगवान दराडे, विष्णूपंत अकोलकर, विष्णूपंत पवार, बंडू पठाडे, जमीर आतार यासह आदींनी तालुक्यातील विविध भागात जात नुकसानीची पाहणी केली. आ. राजळे यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वारकड, गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांना तातडीने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com