
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
बुधवारी आठवडे बाजाराच्या दिवशी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने शहरातील वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कारवाई करत वाहतुकीची शिस्त लावली.
अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनधारकांवर दंड ठोठवला आहे. दुकानांसमोर, सार्वजनिक ठिकाणी तसेच मोकळ्या जागेवर पार्किंग केलेली वाहने, विना क्रमांकाच्या गाड्या उचलत टाकून पाथर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या. त्यांच्यावर कायदेशीर दंडही ठोठावण्यात आला. पाथर्डी पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांपासून पाथर्डी शहरात व तालुक्यात सुसाट वेगाने वाहन चालवणारे वाहनधारक, नियम मोडून रस्त्यावर गाडी फिरवणारे, मुलींची छेड काढणारे, शाळा, कॉलेज, महाविद्यालय आशा ठिकाणी भाईगिरी करणारे तरुण, काही लॉजवर जाणारे अल्पवयीन अशांविरोधात कारवाईची मोठी मोहीम पाथर्डी पोलिसांकडून हाती घेतली आहे.
त्याचाच हा भाग म्हणून आज आठवडे बाजाराचे निमित्त साधत जोरदार कारवाई पोलीस पथकाने केली. बुधवारी पाथर्डी येथे आठवडे बाजार असतो त्यावेळी तालुक्यातील अनेक लोक पाथर्डी शहरात येतात, त्यांच्याकडून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहने चालवण्यात व पार्किंग करण्यात येतात त्यामुळे आज पाथर्डी पोलिसांनी विशेष मोहीम कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायदे, कौशल्यराम निरंजन वाघ, उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, सचिन लिमकर या अधिकार्यांसह पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
वाहन चोरी, अवैध प्रकार, गुन्हेगारी रोखणे यासह वाहतुकीचे नियम मोडणारे, वाहतुकीस अडथळा करणार्या अशांवर ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार आहे.
- सुहास चव्हाण, पोलीस निरिक्षक पाथर्डी