
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक विहीर व गाय-गोठा योजनेचा लाभ देताना ग्रापंचायतीने दिलेल्या ठरावामध्ये बदल करून तत्कालीन पदाधिकार्यांनी हस्तक्षेप करून चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांची यादी मंजूर केली. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्याकडे केली आहे. गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी यावर तातडीने कार्यवाही करत पाच जणांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती कर्मचार्यांसह माजी पदाधिकार्यांची चौकशी होणार आहे. यामुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत आव्हाड यांनी गटविकास अधिकारी डॉ. पालवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक विहीर व गाय-गोठा या योजनेचा लाभ देताना ग्रापंचायतीने दिलेल्या ठरावामध्ये बदल करून चुकीच्या पद्धतीने पदाधिकार्यांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायत ठराव डावलून लाभार्थ्यांची यादी मंजूर केल्याची तक्रार आम आपचे आव्हाड यांनी केली आहे.त्यावर गटविकास अधिकारी डॉ. पालवे यांनी चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
यामध्ये स्वतः गटविकास अधिकारी डॉ. पालवे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल सानप, बांधकाम विभागाचे उपअभियंता उमेश केकाण, कृषी अधिकारी विष्णू पालवे, विस्तार अधिकारी एम.पी.इसरवाडे या पाच अधिकार्यांची समिती स्थापन केली आहे. पाथर्डी पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील 2020 ते 2022 या काळातील वैयक्तिक विहीर व गायगोठा योजनेचा लाभ देताना अनियमितता झाली आहे का, ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावात बदल केला आहे का, केला असल्यास कोणाच्या सांगण्यावरून केला, अशा मुद्यांच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश डॉ.पालवे यांनी दिले आहेत. चौकशी समितीने तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेश डॉ. पालवे यांनी दिले आहेत.
पंचायत समितीमध्ये विहिरी व गाय, गोठा प्रकरणे मंजूर करताना अनियमीतता करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. यामध्ये काही कर्मचारी व पदाधिकार्यांचा समावेश आहे. विहिरीसाठी अनेक लाभार्थ्यांकडून पैसे उकळले आहेत. काहीचे पैसे घेऊनही तीन ते चार वर्षांपासून मंजुरी मिळालेली नाही. त्यांचे पैसे परत करावेत यासाठी पंचायत समितीच्या माजी पदाधिकार्यांच्या घरी लाभार्थी चकरा मारत आहेत. लाभही नाही व पैसेही गेले अशी काही लाभार्थ्यांची अवस्था झाली आहे. याची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे.
- किसन आव्हाड, (जिल्हाध्यक्ष आप).