दहा पं.समिती गणांसाठी पाथर्डीत सोडत

राजकीय पक्षांची हजेरी || भाजप-राष्ट्रवादीत रंगणार सामना
पाथर्डी पंचायत समिती
पाथर्डी पंचायत समिती

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पंचायत समितीच्या 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दहा सदस्यांच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या अध्यक्षेतखाली तहसीलदार शाम वाडकर यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात काढली. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय माळी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काढण्यात आलेल्या आरक्षणात कासारपिंपळगाव गण सर्वसाधारण महिला), कोरडगाव सर्वसाधारण महिला, भालगाव सर्वसाधारण, अकोला सर्वसाधारण महिला, माळीबाभुळगाव सर्वसाधारण), तिसगाव ओबीसी महिला, मिरी ओबीसी व्यक्ती, करंजी सर्वसाधरण, माणिकदौंडी सर्वसाधारण आणि टाकळीमानूर अनुसूचित जाती महिला याप्रमाणे आरक्षण सोडत निघाली आहे.पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रकला सोमनाथ खेडकर यांचा टाकळीमानूर गण अनुसूचीत महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे.

मात्र, जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण झाल्याने त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तिसगाव गण प्रवर्ग महिला राखीव झाल्याने विद्यमान सदस्य सुनील परदेशी यांचीही अडचण झाली आहे. मिरी गणातून राहुल गवळी, माणिकदौंडी गणातून सुनील ओव्हळ, माळीबाभुळगाव गणातून रविंद्र वायकर, करंजी गणातून एकनाथ आटकर, कोरडगाव गणातून माजी सभापती सुनीता गोकुळ दौंड यांना संधी मिळू शकते.

पंचायत समितीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षात दुरंगी लढत होईल. जिल्हा परिषदेचा कासारपिंपळगाव हा एकमेव गट महिलेसाठी राखीव झाला आहे.तेथे कासार पिंपळगावच्या विद्यमान सदस्य राहुल राजळे व कासार पिंपळगावच्या विद्यमान सरपंच मोनाली राजळे यांना संधी मिळू शकते. तर राष्ट्रवादीकडून माजी जि.प.सदस्या योगीता राजळे यांना पुन्हा रिंगणात उतरविले जाऊ शकते. भालगाव जिल्हा परिषद गटामधे विद्यामान सदस्या प्रभावती ढाकणे यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा संधी मिळू शकते.

तर भाजपाकडून भालगावच्या सरपंच डॉ. मनोरमा खेडकर व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. पक्ष कोणाला संधी देईल हे वेळ आल्यावर समजेल.टाकळीमानूर जिल्हा परीषद गटात भाजपाकडून जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे व विद्यमान जि.प.सदस्या ललिता शिरसाट यांचे पती व माजी जि.प.सदस्य अर्जुन शिरसाट यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. राष्ट्रवादीकडून बाजार समितीचे माजी सभापती गहीनीनाथ शिरसाट, पिंपळगाव टप्पाचे सरपंच पांडुरंग शिरसाट यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. तसेच शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अंकुश चितळे हे सुद्धा इच्छुक आहेत.

मिरी-करंजी जि.प.गटात राष्टवादीकडून पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे,युवा नेते अमोल वाघ, शिवसेनेकडून माजी जि.प.सदस्या उषाताई कराळे यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपाकडून चारुदत्त वाघ, वैभव खलाटे, करंंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे यांच्यापैकी एकाला संघी मिळू शकते. तिसगाव जिल्हा परीषद गटातून भाजपाकडून विद्यमान जि.प.सदस्या संध्या आठरे यांचे पती पुरुषोत्तम आठरे, मढीचे सरपंच व कानिफनाथ देवस्थान समीतीचे अध्यक्ष संजय मरकड, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कुशल भापसे प्रबळ दावेदार आहेत, येथे यांच्या पैकीच एकाला संधी मिळू शकते. तर राष्ट्रवादीकडून माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांचे नाव आघाडीवर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com