पाथर्डी पंचायत समिती : काम न करताच रस्त्याचे बोगस बील काढण्याचा प्रयत्न

चौकशीत अनेक बोगस कामे बाहेर येण्याची शक्यता
पाथर्डी पंचायत समिती : काम न करताच रस्त्याचे बोगस बील काढण्याचा प्रयत्न

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

पाथर्डी पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता, मजूर संस्थेचा ठेकेदार व वरिष्ठांना हाताशी धरून संगनमत

करून मार्च एण्डच्या नावाखाली काम न झालेल्या रस्त्याच्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला देत ठेकेदारास बील काढण्यास मदत केली. दरम्यान, या रस्त्याच्या कामाची मुदत संपली असून अद्याप काम झालेले नाही. मात्र अधिकार्‍याने काम पूर्ण दाखवून बोगस बील काढण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रभुपिंप्री (ता.पाथर्डी) येथील मजूर संस्थेला जिल्हा वार्षिक योजना 3054 या योजनेतून पागोरी-पिंपळगाव ते सोमठाणे-नलवडे या रस्त्याच्या 10 लाख रुपये अंदाजपत्रकीय रक्कमेचे 1 हजार 100 मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले होते. या कामाला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कार्यारंभ आदेश संबंधित संस्थेला 31 डिसेंबर 2019 मध्ये दिला. हे काम पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2021 होती. प्रत्यक्षात या कालावधीत ठेकेदाराने कोणतेच काम केले नाही. तरीही पंचायत समीतीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.डी.राठोड यांनी न झालेल्या रस्त्याच्या कामाचा 31 मार्च 2021 रोजीच काम पूर्णत्वाचा दाखला दिला.

या प्रकाराची कुणकुण सभापती सुनीता दौड यांचे पती गोकुळ दौंड व पंचायत समीती सदस्य विष्णूपंत अकोलकर यांना लागताच त्यांनी जिल्हा परिषद गाठून संबंधित कागदपत्रे गोळा करून खात्री केली. दरम्यान, उपअभियंता व ठेकेदार यांना प्रकरण अंगलट येणार याची चाहूल लागताच त्यांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित रस्त्यावर खडी, क्रश, डांबर आणून रस्ता करण्याची तयारी सुरू केली. शुक्रवारी दुपारी गोकुळ दौंड, विष्णूपंत अकोलकर यांनी उपसरपंच प्रकाश दौंडे, भरत नलवडे, माजी उपसरपंच अमोल नलवडे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम नलवडे, सुधाकर नलवडे व ग्रामस्थांसह प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली, असता ठेकेदार काम सुरू करण्याच्या तयारीत आढळून आला.

गोकुळ दौंड, विष्णूपंत अकोलकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी निलंबीत झाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही.असे सांगत काम थांबविण्याची ठेकेदारास सूचना केली. त्यावर ठेकेदाराने मजुरासह काढता पाय घेतला. याबाबत उपअभियंता राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. याप्रकरणी जि.प.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामावर भेट दिल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले.

विशेष म्हणजे न झालेल्या रस्त्याच्या कामावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जोशी यांनी ही भेट देऊन पाहणी केल्याची पंचायत समितीत कागदोपत्री नोंद आहे. रस्ता न होताच बील काढण्यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी कागदपत्रांची पुर्तता करून ठेकेदाराला बोगस बील मिळवून देण्यासाठी मदत केली. याप्रकरणात अनेकांचे हात गुंतलेले असून संबंधित कामाचे सोशल ऑडिट करून संबंधित अधिकार्‍याला निलंबित केल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. तर गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी कामाबाबत तक्रार आली असून त्याठिकाणी भेट देऊन पाहणी करून वरिष्ठांना सविस्तर अहवाल पाठविला जाईल असे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com