पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

सध्या सुस्तावलेल्या पालिका प्रशासनाने अंग झटकून कामाला लागावे. विकास कामे सुरू असली तरी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून

मुलभूत सेवा सुविधांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे नागरिकांना किरकोळ कामासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळोवेळी तोंडी सांगून देखील कामकाजात सुधारणा होत नसल्याने अखेर निवेदनाद्वारे आपणाला लेखी कळविले आहे. याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने कामकाजात सुधारणा करावी.

अन्यथा सोमवारी मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी शहराच्या समस्यांची पाहणी करून सोडवणूक करावी. अन्यथा पालिका कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा सत्ताधारी भाजपाच्या आरोग्य समितीचे सभापती प्रवीण राजगुरू व नगरसेविका संगीता गट्टाणी यांनी दिला आहे.

सभापती राजगुरू व नगरसेविका गट्टाणी याबाबत निवेदन देण्यासाठी पालिका कार्यालयात गेले असता अवघे तीन कर्मचारी तेथे उपस्थित होते. मुख्याधिकार्यांसह कुठलाही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे राजगुरू व गट्टाणी व यांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाच्या दरवाजावरच निवेदन चिटकवले.

त्यात म्हटले की गेल्या अनेक दिवसांपासून आपणाकडे क्रांती चौक ते गणेश पेठ या भागातील पिण्याचे पाईपलाईन नवीन करण्याची मागणी केली आहे. या भागात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र याचे देखील गांभीर्य आपणाला नाही.

वेळोवेळी आपणाकडे मागणी करून देखील आपण याची दखल घेतलेली नाही. तरी आपण तातडीने पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू करावे. येथील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करून दिलासा द्यावा. गेल्या अनेक महिन्यापासून शहरासह उपनगर व वाडी-वस्तीवर अंधाराचे साम्राज्य आहे.

याठिकाणी आवश्यक असणार्या केबल खरेदीचा ठराव दोन महिन्यांपूर्वी होऊन देखील अद्यापही खरेदी करण्यात आलेली नाही. यामुळे विद्युत रोषणाईचा असलेला दीपावली पाडव्याचा सण देखील नागरिकांना अंधारामध्ये साजरा करावा लागला. यासंदर्भात आपण तात्काळ आवश्यक त्या केबलची खरेदी करून अंधार असलेल्या भागांमध्ये तातडीने विद्युत दिवे सुरू करावेत.

गेल्या अनेक महिन्यापासून शहराच्या अपघात प्रवण क्षेत्रामध्ये गतिरोधक बसवण्याची नागरिकांची व वाहनधारकांची मागणी आहे. यासंदर्भात संबंधीत ठेकेदाराला गेल्या काही महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.शहरांमध्ये आवश्यक त्याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने गतिरोधक बसवावेत.

पावसाळ्यानंतर शहरात अनेक ठिकाणी छोटे-मोठे गवत, बाभळी वाढल्या आहेत. त्याची जेसीबीने साफसफाई करण्यात यावी.पाथर्डी नगरपालिका मालकीच्या भूखंडांना तारेचे कुंपण टाकावे.शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. ठेकेदारची मुदत संपून आठ ते नऊ महिने झाले आहेत. तरी देखील नवीन ठेकेदाराचा शहरात अद्यापही तपास नाही. शहरातील बहुतांशी सार्वजनिक शौचालये अस्वच्छतेचे आगार बनले आहेत.अनेकांनी अनेकदा मागणी करून देखील महिलांसाठी मुतारीची व्यवस्था नाही. अनेक समस्यांबाबत यापूर्वी अनेकदा तोंडी मागणी केली आहे.

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पदाधिकार्यांची नाहक बदनामी होत आहे. यामुळेच आम्हाला लेखी तक्रार करण्याची वेळ आली आहे. आता नगरसेवकासह जनतेचा देखील संयम संपत चालला असून केव्हाही उद्रेक होऊ शकतो. यापूर्वी आपण स्वतः सर्व विभाग प्रमुखासह सोमवारी 7 डिसेंबर रोजी शहराची पाहणी करून त्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

पालिकेत भाजपाची सत्ता आहे. राजगुरु व गट्टाणी हे सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने भाजपला हा घरचा आहेर समजला जात आहे. मात्र दुसरीकडे जनतेच्या भावना तीव्रतेने मांडल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.