
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
आगामी पाथर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे. वीस उमेदवारांना संधी मिळू शकते. मात्र कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल.ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना इतर ठिकाणी व पक्ष संघटनेत पदावर सामावून घेतले जाईल. ज्यांना पक्ष उमेदवारी देईल त्यांच्यासाठी एकोप्याने काम करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.
शहरातील आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहामधे भाजपाच्या शहरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे, अशोक चोरमले, अशोक गर्जे, नारायण धस, माणिक खेडकर, नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, जनाबाई घोडके, काशीबाई गोल्हार, प्रविण राजगुरु, अनिल बोरुडे, बंडू बोरुडे, मंगल कोकाटे, डॉ.सुहास उरणकर, नामदेव लबडे, जगदीश काळे, बबन बुचकुल, बबन सबलस, आजीनाथ मोरे, रमेश गोरे, पांडुरंग सोनटक्के, अॅड. प्रतिक खेडकर, नितीन एडके, नारायण जाधव, शारदा हंडाळ, अर्चना फासे, ज्योती मंत्री आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राजळे म्हणाल्या, नगरपालिकेत गेली पाच वर्षे भाजपाची सत्ता होती. पहिले अडीच वर्षे निधी मिळाला. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार आले. त्यावेळी निधीची अडचण आली होती. आता पुन्हा भाजपा-सेनेचे सरकार आले आहे. यापुढील काळात नगरपालिकेला विकासकामासाठी निधीची अडचण दूर झाली आहे.शहराच्या नवीन पाणी योजनेसह विविध विकासाच्या योजना मार्गी लावण्यासाठी पालिकेत सत्ता आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे अवाहन आ. राजळे यांनी केले.