पाच वर्षे गायब असलेला पाथर्डी नगरपालिकेचा जेसीबी अवतरतो तेव्हा...!

भ्रष्टाचाराचा कळस झाल्याचा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
पाच वर्षे गायब असलेला पाथर्डी नगरपालिकेचा जेसीबी अवतरतो तेव्हा...!

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी नगरपालिकेच्या मालकीचा नियमबाह्य रित्या दुरुस्तीसाठी म्हणून गायब असलेला जेसीबी अखेर नादुरुस्त अवस्थेतच अचानक पालिकेच्या वाहन तळावर अवतरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे याबाबत कुठलीही माहिती प्रशासनाला नसल्याने शहरभर पालिकेच्या भ्रष्टाचाराचा कळस झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरीकांमधून उमटत होत्या. तसेच याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मंगळवारी (दि.28) पालिका प्रशासनाला माहिती न होऊ देता अचानक पावणे पाच वर्षांपूर्वी दुरुस्तीला गेलेला जेसीबी पालिकेच्या वाहन तळावर उभा असलेला पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आला. शहरातील विविध कामांसाठी दैनदिन वापरण्यासाठी लाखो रुपये खर्चून जेसीबीची खरेदी करण्यात आली होती. पाच वर्षांपूर्वी भाजपा सत्तेत येताच पालिकेचा नादुरुस्त जेसीबीचे सुटे भाग मिळत नसल्याचे कारण पुढे करत तत्कालीन मुख्याधिकारी वसुधा कुरनावळ यांच्या कालावधीत जेसीबी दुरुस्तीसाठी नगरला पाठवण्यात आला होता. परंतु यासाठी आवश्यक ठराव,निविदा,संमती घेण्यात आल्या नाहीत.

नियमबाह्यरित्या जेसीबी दुरुस्तीला पाठवण्यात आला व दुरुस्त होऊन येत नसल्याबाबत प्रसार माध्यमातून आवाज उठविण्यात आला होता. मात्र यानंतरही जेसीबी दुरुस्तीच्या ठरावाला व जेसीबी पाठवणीला तब्बल पावणेपाच वर्षांचा कालावधी उलटून गेला असताना देखील पालिकेचा जेसीबी दुरुस्त होऊन परत आलाच नाही. याबाबत अनेक नगरसेवक व नगरसेविकांनी पालिका सभागृहात चौकशीची मागणी केली होती.

परंतु पुढे ठोस कार्यवाही झाली नाही.दरम्यानच्या काळात पालिकेला विविध ठिकाणी सफाई व अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेने मर्जीतल्या ठेकेदाराचा जेसीबी भाड्याने लावला व विविध कामांसाठी आज अखेर दोन नवीन जेसीबी खरेदी करता येईल एवढ्या रकमेची बिले जेसीबी कामासाठी काढण्यात आली आहेत. चार वर्षांचा कालावधी उलटूनही जेसीबी दुरुस्त न होता नादुरुस्त जेसीबी पालिका आवारात आणून सोडल्याने खुलेआम भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर शहरवासीयांकडून पालिकेच्या व सत्ताधार्‍यांचे सोशल माध्यमावर वाभाडे काढण्यात येत असून पालिकेचा जेसीबी हा येत्या कालावधीत सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

जेसीबीच्या दुरुस्तीचे कुठलेही बिल पालिका प्रशासनाने संबंधितांना दिले नाही.जेसीबी कुठे होता व पाथर्डीत कधी आला याबाबत माहिती नाही.

- मुख्याधिकारी संतोष लांडगे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com