
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक पंचवार्षीक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीमध्ये वीस पैकी दोन जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्या असुन उर्वरीत अठरा जागा सर्वसाधारण वर्गासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यात नऊ महिला व नऊ पुरूष असे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे दहा महिलांना संधी मिळणार आहे.
आज नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेचे मुख्यधिकारी संतोष लांडगे यांनी आरक्षण सोडत केली. शुभम गणेश काकडे व राधिका देविदास कोकाटे या मुलांच्या हस्ते सोडती कढण्यात आल्या.अनुसूचित जातीसाठी दोन जागा आरक्षित राहिल्याने उर्वरित अठरा जागेपैकी सर्वसाधारण महिला नऊ व सर्वसाधारण व्यक्ती नऊ जागा असणार आहे.
पाथर्डी नगरपरिषदेच्या दहा प्रभागात प्रत्येकी दोन उमेदवार असून एकूण वीस उमेदवारांची संख्या आहे. प्रभात दोन मधील अ गटात अनुसूचित जातीतील महिला तर प्रभाग आठ मधील ब अनुसूचित जाती सर्वसाधारण व्यक्ती असे आरक्षण आहे. प्रभाग 2 आता अनुसूचित जाती महिलेचे आरक्षणाने माजी नगरसेवक प्रवीण राजगुरू,आबासाहेब काळोखे ,डॉ जगदीश मुने या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी कुटूंबातील महिलेला संधी द्यावी लागेल.
तर इच्छुक उमेदवार माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले यांना हा प्रभाग सोईस्कर झाला आहे. प्रभाग 8 हा अनुसूचित जातीच्या व्यक्तीसाठी आरक्षणाने नितीन एडके,दिलीप मिसाळ यांना निवडणुकीत चांगली संधी मिळू शकते. या आरक्षण सोडतीमुळे फारसा काही फरक राजकीय आकडेमोडीत पडणार नाही.
आरक्षण असे -
प्रभात 1 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग 2 अ अनुसूचित जाती महिला,ब सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग 3 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग 4 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण व्यक्ती,5 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण व्यक्ती, प्रभगा 6 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग 7 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग 8 अ सर्वसाधारण महिला, ब अनुसूचित जाती व्यक्ती, प्रभाग 9 अ सर्वसाधारण महिला,ब सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग 10 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण व्यक्ती असे प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. यानुसार सर्वसाधारण 9 महिला व 9 पुरूष असणार आहेत.