पाथर्डी नगरपरिषदेवर संतप्त महिलांचा हंडा मोर्चा

हंडाळवाडी परिसरात दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा खंडीत
पाथर्डी नगरपरिषदेवर संतप्त महिलांचा हंडा मोर्चा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी नगरपरिषद हद्दीतील हंडाळवाडी अंतर्गत असणार्‍या भापकर वस्ती, औटी वस्ती व विठ्ठल नगरला होणारा पिण्याचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून खंडित झाल्याने येथील संतप्त महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

या मोर्चाचे नेतृत्व या भागातील माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सविता भापकर, चंद्रकांत भापकर, देवा पवार, आतिश निर्‍हाळी, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, आरती निर्‍हाळी यांनी केले.

पाथर्डी नगरपरिषद हद्दीमध्ये हांडेवाडी परिसरातील वाडी, वस्ती परिसराला नगरपरिषदे कडून नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून भापकर वस्ती, औटी वस्ती व विठ्ठल नगरला पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी या भागातील माजी नगरसेविका सविता भापकर यांनाही कल्पना दिली. भापकर यांनी पालिकेकडे वेळोवेळी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सविता भापकर व परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढत नगरपरिषदेच्या कार्यालयात हे आंदोलन केले.

नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केल्याने कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात पाणी नाही.पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे.आमचा खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्हाला तात्कळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करा अशी मागणी आंदोलन करताना लावून धरली.

यावेळी बोलताना सविता भापकर म्हणाल्या की, वारंवार नगरपरिषद प्रशासनाकडे पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मागणी केली. याची दखल घेतली नाही. त्यामुळे वाडी वस्ती वरील गरीब शेतकरी कुटुंबातील लोकांना पाण्यापासून दोन महिने वंचित राहावा लागले.पाण्यासाठी महिलांना वनवन भटकण्याची वेळ नगरपरिषदेमुळे आली आहे.

आम्हाला पाणी मिळाले नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी भापकर यांनी दिला. पुष्पा धस, मंगल धस, कांता आठरे, कमल खोर्दे, मीरा भापकर, कविता धस, जनाबाई खोर्दे, इंदूबाई धस, आसराबाई भापकर, संभाजी धस, शिवप्रसाद खोर्दे आदींच्या मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिलेल्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत

वीज पुरवठा अभावी खंडित झालेला पाणीपुरवठा दोन ते तीन दिवसात सुरू करण्यात येईल तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com