
पाथर्डी | Pathardi
सात वर्षांपूर्वी अतिआत्मविश्वास व अपघाताने माजी आमदार राजीव राजळे यांच्या ताब्यातून गेलेली पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीची सत्ता परत मिळवून स्व. राजीव राजळे यांचे स्वप्न साकार करायचे असा चंग मनामध्ये बांधत आमदार मोनिका राजळे यांनी अत्यंत शांत व संयमाने केलेले डावपेच व नियोजन करत अॅड. प्रताप ढाकणे यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचीच तालुक्यात चर्चा आहे.
भाजपाप्रणीत आदिनाथ शेतकरी मंडळाने 18 पैकी 17 जागा मिळवत सत्ता ताब्यात घेत स्व.राजीव राजळे यांचे स्वप्न साकार केले. तर याउलट गेल्यावेळी ज्या पद्धतीने सत्ता मिळविली तीच पद्धत पुन्हा वापरून सत्ता येईल या भ्रमात असलेल्या अॅड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महाविकास आघाडीप्रणीत जगदंबा शेतकरी विकास मंडळाचा सुपडासाफ होऊन मोठा पराभव झाला त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.
बाजार समिती निवडणुकीसाठी आदिनाथ शेतकरी मंडळ व जगदंबा शेतकरी विकास मंडळ या दोन पॅनलमध्ये समोरासमोर सरळ लढत झाली. फक्त ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेसाठी आकाश वारे या एकमेव अपक्ष उमेदवाराचा अपवाद होता. एकाच दिवशी प्रचाराचा शुभारंभ करून सुसाट सुटलेल्या आदिनाथ शेतकरी मंडळाच्या राजळे विखे कर्डिले एक्सप्रेसच्या विजयाची खात्री पटल्याने प्रत्येक स्टेशनवर मतदारांचे डब्बे हाऊसफुल्ल होत होते. तर दुसरीकडे पराभवाची चाहुल लागल्याने जगदंबा शेतकरी विकास मडळाच्या ढाकणे घुले तनपुरे एक्सप्रेसमधील मतदार प्रत्येक स्टेशनवर डब्यातून उतरून अदिनाथ शेतकरी मंडळ एक्सप्रेसच्या डब्यात बसत होते.
आदिनाथ शेतकरी विकास मंडळाने श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे खा.डॉ.सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला. जाहिरनामा प्रसिद्ध करून सत्ताधार्यांना काही प्रश्न विचारले मात्र भाषणातून विरोधकाच्या कारभारावर टीका करण्याचे टाळत सत्ता आल्यावर बाजार समितीचा कारभार कसा केला जाईल याचे व्हिजन मांडत मतदारांना आश्वासित केले. हे मतदारांना भावले तेथेच अदिनाथ शेतकरी मंडळाच्या विजयाचा पाया रचला गेला.
जगदंबा शेतकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अॅड.प्रताप ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार घुले यांनी निवडणूक बाजार समितीची आसताना बाजार समितीमध्ये गेल्या सात वर्षात काय विकास केला हे सांगण्याऐवजी वृद्धेश्वर कारखाना, आमदारकी व नगरपालिकेच्या कारभारावर आरोप करत आमदार मोनिका राजळे यांच्यावर वैयक्तीक अत्यंत अपमानस्पद टीका केली. ही टीका उपस्थित मतदारांना आजिबात न पटल्याने तिथेच जगदंबा शेतकरी विकास मंडळाच्या पराभवाची बीजे पेरली गेली.
अदिनाथ शेतकरी मंडळासाठी आमदार राजळे यांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी मतदाराचे गणनिहाय मेळावे घेऊन उमेदवारांची चाचपणी केली.त्यामुळे उमेदवारांची निवड करणे त्यांना सोपे गेले.उमेदवारांची निवड करतांना आमदार राजळे यांनी जनतेतील चेहरे दिले. माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या पश्चात पहिलीच सार्वत्रीक निवडणूक असल्याने अत्यंत काळजीपूर्वक व जबाबदारीने निवडणूक प्रक्रिया हाताळत नव्या जुन्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन त्यांचा एकत्रीत मेळ घालून प्रत्येकावर विशिष्ट जबाबदारी देऊन आ. राजळे यांनी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, व मतदार यांच्या प्रत्येक हालचालीवर स्वतः वैयक्तीक लक्ष ठेवुन कुठेही दगाफटका होणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्या या भुमिकेमुळे प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता स्वतः उमेदवार आहे असे समजून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन प्रचार करताना दिसत होता.
अखेर सर्वच अंदाज चुकवत आदिनाथ शेतकरी मंडळाने दोनशेपेक्षा जास्त फरकाने 17 जागा जिंकून सत्ता खेचून आणली तर जगदंबा शेतकरी मंडळाला फक्त एक जागा दोन मतांच्या फरकाने मिळाली.शेवटी बाजार समितीच्या या अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या निवडणुकीत कर्तृत्व व लोकप्रियतेच्या बळावर आमदार मोनिका राजळे ह्याच मॅन ऑफ द मॅच व किंगमेकर ठरल्या आहेत. ज्याचा उपयोग त्यांना येणार्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे.