
पाथर्डी |प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी शहरातील कोरडगाव रोडवरील हरिजन वस्ती येथे विनापरवाना बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करणार्या अड्ड्यावर आज सकाळी पाथर्डी पोलिसांनी छापा टाकून साहित्य नष्ट केले. तसेच एकास अटक केली आहे.
कैलास भाऊ काळोखे (41, रा. हरिजन वस्ती कोरडगाव रोड,पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि.30) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, शहरातील कोरडगाव रोडवर हरिजन वस्ती येथे कैलास काळोखे नावाचा व्यक्ती हातभट्टीची दारू तयार करत आहे.
त्या माहितीच्या आधारे पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप बडे, कुमार कराड, भाऊसाहेब खेडकर, संदीप कानडे, नारायण कुटे यांनी हा छापा टाकला. यात पोलिसांनी 4 हजार 800 रुपये किंमतीचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य, काळागूळ, रसायन असा मुद्देमाल जागीच पोलिसांनी नष्ट केला आहे. काळोखे याच्याविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.