पाथर्डी : माजी नगरसेवक चाँद मण्यार यांच्यावर गुन्हा दाखल
सार्वमत

पाथर्डी : माजी नगरसेवक चाँद मण्यार यांच्यावर गुन्हा दाखल

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी|Pathardi

शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड-19 सेंटरमध्ये असणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णांना अनधिकृतरित्या भेटायला गेलेल्या माजी नगरसेवकाविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डी शहरासह तालुक्यात आज पर्यंत 132 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून प्रशासनाने शहरातील आजाद चौक तसेच खाटिक गल्ली परिसर सील केला आहे. या परिसरातील नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशाचे तसेच कोविड-19 च्या नियमांचे पालन न करता माजी नगरसेवक चाँद हुमायुन मण्यार यांनी प्रतिबंधित क्षेत्र ओलांडून उपजिल्हा रुग्णालयातील पोलीस बंदोबस्तातील पोलीस कर्मचार्‍यांची नजर चुकवून करोना बाधित उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेवून सोशल मीडीयावर फोटो व्हायरल केले.

तसेच स्वता:चे व इतरांचे जीवितास धोका होईल अशा रीतीने करोना रोगाचा संसर्ग पसरवण्यास मदत केल्या प्रकरणी चांद मण्यार यांच्या विरोधात सोशल डिस्टन्स न पाळणे, करोना रोगाच्या प्रसाराबाबत खबरदारी न घेणे, भादवी कलम 188,269,270, करोना उपाययोजना 2020 चे अधिनियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे पोलीस शिपाई अतुल शेळके यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, इतरही बाधित असणार्‍या रुग्णांना जेवणाचे डबे इतर वस्तू नातेवाईकांमार्फत पुरविल्या जात असल्याचा काही नागरिकांकडून आरोप केला जात आहे. अशा नातेवाईकांवर देखील प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com