पाथर्डी : सकाळी सात ते अकरादरम्यान अत्यावश्यक दुकाने सुरू राहणार

आ. मोनिका राजळे : सोमवारपासून पाथर्डीत अंमलबजावणी
पाथर्डी  : सकाळी सात ते अकरादरम्यान अत्यावश्यक दुकाने सुरू राहणार

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

तालुक्यासह शहरात वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे येत्या सोमवार (दि. 19) पासून अत्यावश्यक सेवेची दुकाने

सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला.

तहसील कार्यालयात आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वारकड, उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अशोक कराळे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे,गटविकास अधिकारी शीतल खिंडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे हे उपस्थित होते.

बैठकीत शाम वारकड यांनी कोव्हीड रुग्णांसाठी 800 बेडची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विविध विद्यालयाच्या इमारती ताब्यात घेतल्या असून आत्तापर्यंत 34 हजार 231 जणांच्या कोव्हीड टेस्ट केल्या आहेत. त्यापैकी 6 हजार 713 व्यक्तींना करोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून सध्या 666 रुग्णांवर उपचार चालू असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी भगवान दराडे यांनी सध्या टेस्टिंग किट संपले असल्याने उद्यापासून करोना बाधित रुग्णांची तपासणी करता यावी, यासाठी चार हजार किटची मागणी वरिष्ठांकडे केली असून ती पूर्ण झाली तरच करोना रुग्णांची उद्या तपासणी करता येईल अन्यथा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. डॉ.अशोक कराळे यांनी आत्तापर्यंत शहर व ग्रामीण भागातील 12 हजार 245 जणांनी लस घेतल्याची माहिती दिली. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने येत्या सोमवारपासून अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळी 11 नंतर विनाकारण फिरणार्‍या व विना मास्क फिरणार्‍या व्यक्तींवर पोलीस व पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच विनाकारण घरा बाहेर नागरिकांनी पडू नये ,तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन आ. राजळे यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com